हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसाचाराचा मुद्दा सोमवारपासून सुरू होणाऱ्या बजेट सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात मांडण्याची विरोधकांनी तयारी केली आहे. आम आदमी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती यांना राज्यसभेची कार्यवाही स्थगित करून दिल्ली हिंसाचाराची चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे के.के. रागेश, टीके रंगराजन आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी 267 नियमानुसार कामकाज स्थगित करण्याची नोटीस दिली आहे. दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसेत 42 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा जनहिताचा विषय असून तीन्ही सदस्यांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान बजेट सत्राचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत चालल्यानंतर दुसरा टप्पा 2 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. रागेश यांच्याद्वारे राज्यसभा सचिवालयाला पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये सोमवारी सभागृहाचे कामकाज स्थगित करून दिल्लीतील हिसेंवर चर्चा करण्याची मागणी सभापतींकडे करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी देखील दिल्लीतील हिंसेचा मुद्दा आक्रमकपणे मांडू असं म्हटले होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.