कृष्णा कारखान्याच्या सभेत विरोधक समोर असणेच सत्ताधाऱ्यांना झोंबले

५९ प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले नसल्याचा अविनाश मोहिते यांचा पत्रकार परिषदेत आरोप

कराड । य. मो. कृष्णा कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला संस्थापक पॅनेलच्या संचालक, पूर्णवेळ उपस्थित होते. केवळ पन्नास व्यक्तिंच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. विद्यमान अध्यक्ष सुरेश भोसले यांनी या सभेचे कामकाज केवळ तीस-चाळीस मिनिटात
संपविले. चालू वर्षीच्या उसाची राहिलेली एफआरपी कधी देणार, कामगारांच्या मागण्या याबद्दल
चकार शब्द काढला नाही. सभेपुढे आलेल्या ५९ प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक
उत्तर दिले नाही. प्रश्नकर्त्यांना उपप्रश्न विचारायची संधी दिली नाही. माईक काढून घेतले. सभा
ऑनलाईन होती. पण एकाही सभासदाला त्यात सहभागी होता आले नाही. एकंदरीत ही सभा
एक सोपस्कार होते. विरोधक समोर पूर्णवेळ उपस्थित असणे हे त्यांना खूपच झोंबलेले होते हे ऑनलाईन सहभागी झालेल्या सभासदांनी पाहिले असल्याचा आरोप कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अविनाश मोहिते यानी आरोप केला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अविनाश मोहिते म्हणाले,  यावेळी सभा ऑनलाईन होती. आम्हाला ऑनलाईन सहभागी होणे शक्य होते. मात्र, सभासदांनी निवडून दिले असल्याने आम्ही प्रत्यक्ष सहभागी झालो. तत्पूर्वी मुदतीत लेखी स्वरुपात आम्ही प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे त्यांनी दिली नाहीत. आमचे त्यांच्यासाठीचे सभेत विचारलेले प्रश्न आजही कायम आहेत. अध्यक्षांनी आपल्या भाषणात डिस्टीलरीला ३० कोटी नफा झाल्याचे जाहीर केले. तो अहवालातल्या कोणत्या पानावर नमूद आहे. असा नफा झाला असेल आणि अजूनही होत असेल. तर सुमारे ४५ कोटी रुपयांची एफआरपीची जी थकीत रक्कम आहे, ती तातडीने सभासदांच्या खात्यावर जमा करावी. ५५ कोटी रुपये खर्च करुन कारखान्याचे आधुनिकीकरण केले, त्यामुळे ११ ते १२ हजार मे. टन गाळप प्रतिदिनी होईल असे वार्षिक अहवालामध्ये जाहीर केले. मग प्रत्यक्षात २०० ते ४०० टनच ऊस जादा गाळला जातोय.

संस्थापक पॅनेलच्या काळात कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प जवळ जवळ कर्जमुक्त केला. त्या पाच वर्षाच्या काळात १५ कोटी ८२ लाख युनिट वीज मंडळाला विकली. मात्र विद्यमान अध्यक्षांच्या काळात त्यात वाढ व्हायच्या ऐवजी घट झाली. ही घट २ कोटी ८२
लाख युनिट इतकी आहे, हे अपयश का याचा खुलासा हवा. मुळात वीजेची विक्री पाच वर्षात
किती झाली याचा अहवाल बघून खुलासा करावा. आम्हाला बोलू द्यायचे नसेल हे समजू शकतो. पण
सत्ताधारी गटातील संचालकांनाही बोलायची बंदी का? स्वागत, प्रास्तविक, ठराव वाचन, ५९
प्रश्नांपैकी दोनचार प्रश्नांची थातूर मातूर उत्तरे आणि खुद्द अध्यक्षांनीच ‘आता सभा संपवूया’
असे म्हणणे ते हजारो सभासदांनी ऑनलाईन पाहणे हे हास्यास्पद असल्याचे अविनाश मोहिते म्हणाले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like