हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जे वक्तव्य केले आहे ते ऐकून मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीसुद्धा विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, असे पवार म्हणाले होते तसेच या पदाबाबत पवारांनी काही भावना व्यक्त केल्या होत्या. या शाब्दिक चकमकीतूनच दरेकर यांनी पवारांना पत्र लिहिलं आहे. तसेच या पत्रासोबत दरेकर यांनी त्यांच्या गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या “वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाची प्रतसुद्धा शरद पवार यांना पाठवलेली आहे. हे पुस्तक नजरेखालून घातल्यानंतर, आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होतो, याबद्दल आपणास कधीही वाईट वाटणार नाही किंवा या पदाचं अवमूल्यन झाल्याचं शल्यही आपल्याला राहणार नाही. या बद्दल मला विश्वास आहे, असे दरेकर यांनी नमूद केले आहे.
प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आपण देशाचे, राज्याचे एक आदरणीय नेते आहात परंतु, मी यासाठी व्यथित झालो की, त्या प्रकरणाची एकच बाजू आपल्यासमोर आल्यामुळे आपल्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाला वाईट वाटलं आणि पदाचं अवमूल्यन झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली. परंतु, मी महिला शेतकऱ्यांबाबत मांडलेला मुद्दा हा प्रत्यक्षदर्शी त्या महिलांशी बोलल्यानंतर व्यक्त केला होता. त्यात कोणताही राजकीय अभिनिवेश नव्हता, उलटपक्षी विरोधी पक्षनेता पदाच्या कर्तव्य भावनेने या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा केलेला एक विनम्र प्रयत्न होता. असेही दरेकर यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर माझ्या पक्षाने १६ डिसेंबर २०१९ रोजी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली. विरोधी पक्षनेता म्हणून गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा “लेखाजोखा” सादर करणं, हे मी माझं कर्तव्य समजतो आणि याच कर्तव्य भावनेने मी हा लेखाजोखा तयार केलेला आहे. ज्यावेळी मी या पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी सन १९६० पासून विधान परिषदेला विरोधी पक्ष नेत्यांची थोर परंपरा आहे, याची मला जाणीव होती आणि ही जाणीव सतत जागरुक ठेऊनच मी वर्षभरात विरोधी पक्ष नेता म्हणून कामकाज सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे.
गेल्या वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण देश आणि महाराष्ट्र करोना महामारीशी झुंज देत होता. विरोधी पक्षात असलो, विरोधी पक्ष नेता असलो तरी करोना महामारीशी महाराष्ट्र लढत असताना सरकारच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण सहकार्य करण्याचं अभिवचन आम्ही सरकारला दिलं. एक जबाबदार विरोधी पक्ष नेता या नात्यानं करोना काळात सर्व काळजी घेऊन घराच्या बाहेर पडलो आणि अनेक क्वारंटाइन सेंटर्स, कोविड सेंटर्स, जम्बो कोविड सेंटर्स, विविध रुग्णालयं यांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांतील त्रुटी, रुग्णांच्या व्यथा आणि करावयाचे बदल, याविषयी जाणून घेतलं, त्या त्या महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली आणि उपाययोजनातील त्रृटी मंत्री महोदयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून मांडल्या, शिवाय ११० पत्रं लिहून त्यामाध्यमातून सरकारच्या कानावर समस्या घातल्या, असे दरेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याचवेळी राज्यातील कोणकोणत्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले याचा तपशीलही दरेकर यांनी पत्रात दिला आहे.
मी एक लहान कार्यकर्ता आहे. राज्यातील एक आदरणीय व जेष्ठ नेते म्हणून आपल्याकडे पक्षनिरपेक्षपणे पाहिले जाते आणि माझ्याही आपल्याबद्दल याच भावना आहेत. हा लेखाजोखा सादर करण्यामागे किंवा या पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधण्यामागे स्वस्तुतीचा भाग गौण आहे, त्यापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून मी बजावलेले माझे निहित कर्तव्य आणि या पदाचा सन्मान वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, असेही दरेकर यांनी पुढे म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’