उन्नाव प्रकरण: ”योगीचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलंय, तेथील अत्याचार कधी थांबणार?”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्नाव । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होत. आता पुन्हा एकदा उन्नाव जिल्ह्यात दोन दलित मुलींच्या मृत्यू प्रकरण उजेडात आल्यानंतर अनेकांना हादरवून सोडलंय. उन्नाव जिल्ह्यामध्ये एका शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. यातील दोन मुलींचा मृत्यू झाला होता तर तिसरी जिवंत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिच्यावर कानपूरच्या रिजन्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आता चौफेर टीका होऊ लागली आहे.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “अत्यंत भयावह… आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं आहे, उन्नावची घटना मन हेलावून सोडणारी आहे. हे अत्याचार कधी थांबणार?” असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

तर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांनीही या घटनेवर भाष्य केलंय. “उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील घटना अत्यंत भयावह आहे. दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. एक जखमी आहे. मुलीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने एम्स दिल्ली येथे आणायला हवे. आम्ही आता कोणत्याही स्थितीत हाथरसची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आमची टीम घटनास्थळी जात आहे. बहिणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही” असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

‘मुलींसाठी धोकादायक बनललेल्या भाजपशासित उत्तर प्रदेशात सत्ता संरक्षित नृशंत अत्याचाराची आणखी एक विचलित करणाऱ्या घटनेचं केंद्रस्थान उन्नाव बनलंय. जंगलात झाडाला बांधून दोन दलित मुलींची हत्या, एक अतिशय गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल, अत्यंत दु:खद… हैवानांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन न्याय व्हायला हवा’ असं समाजवादी पक्षाकडून म्हटलं गेलंय.

‘उत्तर प्रदेशच्या जनतेला विनंती आहे की जेव्हापर्यंत उन्नाव पीडित बहिणींच्या आरोपींना अटक केली जात नाही तेव्हापर्यंत त्यांचे मृतदेह स्वीकारले जाऊ नयेत, न्यायासाठी दबाव बनवणं गरजेचं आहे. एका बहिणीवर चांगल्या रुग्णालयात उपचार गरजेचे आहेत’ असं ट्विट गुजरातच्या वडगावचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केलंय.

कुटुंबीयांचा दावा
एकीकडे, तीनही मुली ओढणीनं हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे पोलिसांकडून मात्र याला साफ नकार दिला जातोय. शेतात चाऱ्यासाठी गेलेल्या तीनही बहिणी उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला. तेव्हा तीनही मुली आपल्याच कपड्यांनी बांधलेल्या अवस्थेत सापडल्या, असं मृत मुलींच्या कुटुंबीयांनी म्हटलंय.

विषबाधेचा पोलिसांचा दावा
पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार मुली आढळल्या तेव्हा त्यांच्या तोंडातून फेस आला होता. डॉक्टरांनी प्राथमिकदृष्ट्या विषबाधेची शक्यता व्यक्त केलीय. कानपूरमध्ये उपचार सुरू असलेल्या मुलीचा सीटी स्कॅन करण्यात आलाय. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवून आवश्यक ती कारवाई सुरू आहे, असं पोलिसांनी म्हटलंय. प्रशासनाकडून लैंगिक अत्याचार किंवा तत्सम कोणताही प्रकार आढळल्याच्या बातम्यांना नकार दिलाय.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment