कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील धामणी गावाजवळच्या डोंगरात लागलेल्या वणव्यामुळे घरासह काजू व चिक्कूची बाग जळून खाक झाल्याने संबधित शेतकरी कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.धामणी गावापासून सुमारे दीड किलोमीटरवर असलेल्या डोंगरमाथ्यावर एकनाथ बाबुराव नायकवडी (वय ८१) यांचे घर असून आजूबाजूच्या सुमारे दहा एकराच्या परिसरात त्यांची काजू व चिक्कूची बाग व शेती आहे.डोंगर माथ्यावर हे एकच घर असून एकनाथ नायकवडी व त्यांची पत्नी हिराबाई असे दोघेचं तेथे राहतात. सकाळी ते ज्वारीची काढणी करण्यासाठी जवळच्याच शिवारात गेलेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास डाँगरात लागलेला वणवा वाऱ्यामुळे त्यांच्या घरात घुसल्याने घरात आगडोंब उसळला.त्या परिसरात जनावरे चरण्यास घेवून आलेल्या काहींनी प्रकार पाहिल्यावर त्यांनी धावतच शिवारात जावून नायकवडी दांपत्याला या घटनेची माहिती दिली.
सर्वजण घटनास्थळी पोहचेपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते.जवळच विहिरी व पाणीपुरवठ्याची सुविधा असली तरी वीजपुरवठा करणारी केबल तसेच पाईपलाईन जळाल्याने पेटत्या घराकडे हताशपणे बघत बसण्याची वेळ नायकवडी कुटुंबावर आली.
घटने दरम्यान घरातील जनावरे बाहेर चरायला सोडली होती त्यामुळे सुदैवाने ती बचावली. आगीत धान्य, जमिनीची व इतर कागदपत्रे,भांडी,तीन कपाटे, कपडे, पांघरून,रोकड व अन्य प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.नायकवडी दांपत्याच्या उत्पन्नाचे साधन असलेली काजू-चिक्कूची बाग आगीत जळाली . बागेत सुमारे तीन हजार रोपे होती असे श्री.नायकवडी यांनी सांगितले.
मंडल आधिकारी प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी डी.जे कोडाप्पे व त्यांचे सहकारी विजय महापुरे यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा पंचनामा केला.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा