कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
(कै.) आनंदराव चव्हाण व (कै.) प्रेमलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून मलकापूर पालिकेच्या वतीने आज (शुक्रवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी ही माहिती दिली.
मनोहर शिंदे म्हणाले, “येथील पालिकेतर्फे श्रीमती प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नऊ वर्षांपूर्वी “प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान” सुरू केले. ते आजअखेर यशस्वीपणे सुरू आहे. त्याचा दहावा वर्धापन दिन, मोफत बस पास वितरण, गुणवंत विद्यार्थी, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना मुदत ठेवपावती वितरण कार्यक्रम सकाळी पावणेदहा वाजता भारती विद्यापीठात होणार आहे.
माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार मोहनराव कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, प्रांताधिकारी उत्तम दिघे, कऱ्हाड आगारप्रमुख विजय मोरे, यशवंतराव मोहिते विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश माने उपस्थित राहतील. त्यास उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, महिला व बालकल्याण सभापती गितांजली पाटील, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती पूजा चव्हाण यांनी केले आहे.