कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रेल्वेच्या नवीन धोरणानुसार उत्तर पार्लेतील रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्ग करण्याचे काम सुरू आहे. तो भुयारी मार्ग जमिनीपासून वीस फूट खोल असल्याने त्यात पाणी साचत आहे. ते पाणी रेल्वे खात्याने कायमस्वरूपी काढून देण्याची व्यवस्था करावी. रेल्वेच्या दोन्ही बाजूचे रस्ते भुयारी मार्गाला जोडावे. तात्काळ काम सुरू न झाल्यास शेतकऱ्यांसमवेत रेल रोको आंदोलन करणार, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी मध्य रेल्वेचे अधिकारी यांना दिला आहे.
सचिन नलवडे म्हणाले, ” कोपर्डे हवेली, पार्ले, वडोली निळेश्वर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वेचे स्वयंचलित गेट होते. ते बंद केले आहे. त्याठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. तो मार्ग जमिनीपासून वीस फूट खोल असल्याने त्यात पाणी साचत आहे. ते पाणी रेल्वे खात्याने कायमस्वरूपी काढून देण्याची व्यवस्था करावी. रेल्वेच्या दोन्ही बाजूचे रस्ते भुयारी मार्गाला जोड़ावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े व पार्ले ग्रामपंचायतीच्या वतीने मध्य रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता एस. के. सिंग यांना दिले होते.
त्यानुसार साठलेले पाणी कायमस्वरूपी काढण्यासाठी पाईपलाईन करण्यात येणार असून, रस्ते करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते. साठलेल्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी यापूर्वी दोन वेळा काम बंद पाड़ले होते. त्यावेळी रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी 15 दिवसांत काम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भात कोणतीच कारवाई न झाल्याने उत्तर पार्ले, पार्ले, वडोली निळेश्वर येथील शेतकऱ्यांना घेऊन रेल रोको करण्याचा इशारा श्री. नलवडे यांनी दिला आहे.