Sunday, January 29, 2023

…अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणार – हर्षवर्धन जाधव

- Advertisement -

औरंगाबाद – राज्य आणि केंद्र सरकारमधील दोन मंत्री लाभलेल्या सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीची दाहकता गंभीर आहे. या अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळीपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरात मदत न मिळाल्यास सत्तेत असलेल्यांना शेतकऱ्यांचा इंगा दाखवत सळो-की-पळो करणार असल्याचा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दिला. यावेळी अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळी पर्यंतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे.

मागील वर्षीच्या रखडलेल्या पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच या वर्षी पीक विमा मंजूर व्हावा, अतिवृष्टीच्या बाधित क्षेत्राचे 13 मे 2015 आणि 25 जानेवारी 2018 प्रमाणे काढण्यात आलेली राज्य आणि केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे सरसगट पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी. या मागण्यांसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट सोयगाव तहसील कार्यालयावर आसूड आणि रुमणे मोर्चा काढला. या मोर्चाला तालुका कृषी कार्यालयात पासून सुरुवात करण्यात आली तर तहसील कार्यालयावर या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी समारोप करताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य शासनाला थेट मदतीचा अल्टीमेटम देत दिवाळीपर्यंत मदत देण्याची आग्रही मागणी केली. यावेळी जाधव आणि राज्य आणि केंद्र शासनावर चौफेर टीका करत सोयगाव तालुक्याला केंद्र आणि राज्य शासनाचे दोन मंत्री लाभले आहेत. परंतु तरीदेखील या तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर आहेत अशी व्यथा मांडली.

- Advertisement -

शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. अखेरीस पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी मध्यस्थी केल्याने नायब तहसीलदार गोरखनाथ सुळे यांनी शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारले. या मोर्चाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान उन्हाने तापलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती अचानक बिघडली मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.