कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पैसै कुणाला नको आहेत हे सहकार मंत्र्यांनी जाहीर करावे. उसाला एक रक्कमी FRP देण्यास विरोध करणाऱ्या सहकार मंत्र्यांनी त्यांचा आणि त्यांचा पीएचा ही पगार तीन टप्यात घ्यावा. जर एक रक्कमी FRP देण्यास टाळाटाळ करून जर शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असतील तर आम्ही सहकार मंत्र्यांच्या दारात जाऊन शिमगा दिवाळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.
कराड येथे रयत क्रांती संघटनेने आज दि. 1 नोव्हेंबर रोजी ट्रक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कृष्णत क्षीरसागर यांच्यासह शेतकरी आपले ट्रक्टर घेवून मोर्चात सहभागी झाले होते. कृष्णा कॅनाल ते कराड तहसील कार्यालयापर्यंत ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात एकरकमी एफआरपीची मागणी करण्यात आली.
सहकार मंत्री हा स्वयंभू मंत्री नाही. कारण त्याच दाव एकाच्या हातात, त्याला पाणी एकजण पाजत असतो, वैरण एक जण टाकत असतो आणि त्याला पाटीवर गिरवून दिल्यावर वाचून दाखवण्याच काम तो सहकार मंत्री करत असतो, असा टोलेही सहकार मंत्र्यांना सदाभाऊ खोत यांनी लगावला.