हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळं मराठी भाषा दिन चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. विधानभवनात ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ग्रंथ दिंडीनं या सोहळ्याची सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय आमदार या सोहळ्यात सहभागी झाले होते.
या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.”जेव्हा जेव्हा आपल्यावर संकंट आली तेव्हा मदतीसाठी मराठी धावून आली आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानही ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही भाषा मराठी होती. परकीय आक्रमाणावेळीही मराठी धावून गेली होती.” असेच मराठी बाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या मातोश्री मीना ठाकरे यांची आठवण काढली. ”मी शाळेत असताना माझी आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती, असंही ते म्हणाले. मराठी भाषा ही शुद्ध बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शुद्ध लिहिलीही गेली पाहिजे. माझ्या आजोबांचा कटाक्ष होता की मराठी भाषा ही ऱ्हस्व दीर्घाप्रमाणेच उच्चारली गेली पाहिजे,” असंही त्यांनी आपल्या आजोबांची आठवण काढताना सांगितलं.
”मराठीचा दिवस केविलवाणेपणे साजरा करण्याची गरज नाही. काय होणार मराठीचं ही चिंता करण्याची गरज नाही. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. डोके ठिकाणावर आहे का? असं इंग्रजांना ठणकावून विचारणारी मराठीच होती. असं असताना चिंताग्रस्त भावनेनं हा दिवस साजरा का करायचा,” अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. आपण ऐकतो मराठी, बोलतो मराठी तसं मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे, असंही ठाकरे यांनी नमूद केलं. ”अनेक संतांनी आपल्याला मोठा वारसा दिला आहे. तो वाढवता आला नाही, तरी आपल्याला तो टिकावता आला पाहिजे. मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपलं संपूर्ण आयुष्य मराठी राहिलं पाहिजे,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘इये मराठीचिये नगरी’ – LIVE https://t.co/A4HGZUGBaP
— Shivsena Communication (@ShivsenaComms) February 27, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.