रिक्षाचालकांच्या मारहाण प्रकरणी शहरात संताप; आंबेडकरी संघटना,रिक्षाचालक संघटना एकवटल्या

औरंगाबाद : क्रांतिचौक येथे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी ट्राफिक सुरळीत करण्याच्या नावाखाली अजय जाधव ह्या रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती व मारहाण केल्यानंतर त्याचा व्हिडीओ समाज माध्यमात प्रसारित करत “दादाचा दणका” ह्या मंथळ्याखाली सवंग प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न केला.

सदरच्या निंदनीय प्रकरणाविरोधात रिक्षाचालक संघटना व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत अंबादास दानवे विरोधात कायदेशीर कारवाई करावी ही मागणी केली आहे. अंबादास दानवे हे मी शिवसैनिक म्हणून ट्राफिक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो असे स्पष्टीकरण दिले होते परंतु कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला-लोकप्रतिनिधीस सामान्य नागरिकांवर हात उचलण्याचा अधिकार नाही जर वाहतूक सुरळीत करणे हाच तुमचा उद्देश होता तर समाजमाध्यमात व्हिडिओ टाकून तुम्ही काय साध्य करू इच्छिता हा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

अंबादास दानवे यांनी मला मारले ह्याचा मला राग नाही परंतु माझी मानहानी करून स्वतःची पाठ थोपटून घेणे ह्या किळसवाण्या प्रकारामुळे माझी मानहानी झाली आहे.मी चुकीचा असेल तर माझ्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला हवी होती परंतु पोलिसा समोर मला मारहाण केली आहे आई बहिनीवरून शिवीगाळ केली केवळ मी रिक्षाचालक असल्याने माझ्या गरिबीचा गैर फायदा घेत माझ्यावर ही केल्याने मला वेळोवेळी अपमानाला सामोरे जावे लागत आहे.
जे माझ्यासोबत घडले ते इतरांसोबत घडू नये ह्या साठी मी कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे अजय जाधव यांनी सांगितले.पोलिसांनी कायदेशीर कारवाई न केल्यास समस्त रिक्षाचालक व आंबेडकरी संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा तयारीत आहेत. आज सदरील घडल्या प्रकाराची चित्रफीत,विविध समाज माध्यमावर टाकलेला बदनामी कारक मजकूर ह्या च्या प्रति व रीतसर तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयात देण्यात आली असून क्रांतिचौक पोलीस ठाण्यातही तक्रार दिली आहे.

विविध रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींनी आज अजय जाधव यांची भेट घेऊन घडल्या प्रकरणी लढा देण्याचा निर्धार केला ह्या वेळी सचिन निकम,अविनाश डोंगरे,ऍड.अतुल कांबळे, संतोष जाधव,सचिन भुईगळ,अक्षय जाधव,संदीप पटेकर, सुरेश त्रिभुवन, प्रवीण हिवराळे,स्वप्नील गायकवाड,विकास रोडे, मो. बशीर,शेख लतीफ,म.फारुख,जाकेर पठाण,इम्रान पठाण व मराठवाडा रिक्षा चालक कृती समिती, परिवर्तन रिक्षा चालक मालक संघटना,शिव वाहतूक सेना,मनसे वाहतूक संघटना,गब्बर ऍक्शन कमिटी,रिपब्लिकन कामगार सेना,रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची व आंबेडकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.