सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
शहरातील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबळ आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा आगीत जागीच होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री दहा वाजता समोर आली. या घटनेमुळे सातारकरांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच संबधिताचा शोध घेवून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, सदर बाजार मधील लक्ष्मी टेकडी येथे राजेंद्र जाधव यांची कबुतरांची ढाबळ आहे. या ढाबळ मध्ये 50 हून अधिक कबूतर होते. शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञाताने कबुतराच्या ढाबळला आग लावली. त्यामुळे ढाबळमध्ये असलेले 40 कबूतर जागीच मृत्युमुखी पडले. कबुतराच्या ढाबळला आग लागल्याचे समजताच जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
श्री. जाधव यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ढाबळ पूर्णपणे जळून खाक झाली होती. ही आग कोणी लावली हे अद्याप समोर आले नसून घटनास्थळी सातारा पोलिसांनी धाव घेतली. जाधव यांची कोणासोबत भांडणे आहे का, याची माहितीही पोलीस घेत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कबुतरांचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.