अमिरिकेत पोलीस कोठडीत आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर उसळल्या दंगली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । अमेरिकेत पोलीस कोठडीत एका आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे अमेरिकेत हिंसक पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतील वेगवेगळया शहरांमध्ये हिंसाचार, दंगली सुरु आहेत. जॉर्ज फ्लॉयड नावाच्या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत. या प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर शेकडोच्या संख्येने लोकांनी व्हाइट हाऊसबाहेर निदर्शने केली. त्यामुळे व्हाइट हाऊस बंद करण्यात आले आहे. न्यूयॉर्क, अटलांटा, डेनेवर, डेट्रॉईट आणि अन्य काही शहरात शुक्रवारी हिंसाचार झाला. अमेरिकेतील सहा मोठ्या शहरांत तुफान दंगली झाल्या. काही ठिकाणी पोलीस आणि निदर्शकांमध्ये चकमकी झाल्या.

मिनियासोटा प्रांतामध्ये मिनियापोलीस हे शहर आहे. तिथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. पेंटागॉनने अमेरिकन लष्कराच्या पोलीस विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांची मिनियापोलीस शहरात तैनाती केली जाऊ शकते. पेंटागॉनकडून असे आदेश येणे ही फार दु्र्मिळ बाब आहे. त्यातून अमेरिकेत किती गंभीर स्थिती आहे, ते लक्षात येते. डेनेवर, लास वेगास, लॉस एंजिलिस या शहरांमध्ये हजार आंदोलक पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले होते. जॉर्ज फ्लॉयड यांना न्याय देण्याची मागणी त्या पोस्टरमधून करण्यात आली होती.

पोलीस कोठडीत घडलेली घटना खूप भयानक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फ्लॉयड यांच्या कुटुंबीयांशी मी बोललो असून ती खूप चांगली माणसं आहेत असे ट्रम्प यांनी सांगितले. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणारा अत्याचार, अन्यायाचा मुद्दा समोर आला आहे. त्याला वांशिक भेदभावाची किनार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment