चिंताजनक! बहुप्रतीक्षित ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लशीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतांना ऑक्सफर्डने आपली तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी थांबवली आहे. मात्र, चाचणी थांबवल्यामुळे लस शोधण्याच्या प्रयत्नांना धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. एका स्वयंसेवकाला लस दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साइड इफेक्ट आढळून आले. त्यानंतर चाचणी स्थगित करण्यात आली.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनका (AstraZeneca) विकसित करत असलेल्या लशीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. भारतातही या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. मात्र, त्यानंतर ही व्यक्ती आजारी पडली. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या व्यक्तीवर नेमका कोणत्या प्रकारे परिणाम झाला आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. ही व्यक्ती लवकरच बरी होईल, अशी अपेक्षा या प्रकरणाशी निगडीत असलेल्या एका व्यक्तीने व्यक्त केली. एखाद्या लशीची चाचणी स्थगित करणे ही नवी बाब नाही. मात्र, यामुळे जगाला लवकरात लवकर लस उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने विकसित केलेली लस आघाडीवर होती.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणावर लस चाचणी सुरू असताना एखादी व्यक्ती आजारी पडण्याचा धोका असतो. मात्र, त्याची स्वतंत्रपणे चौकशी, वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून याचा परिणाम चाचणीच्या वेळमर्यादेवर होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. ऑक्सफर्ड लशीच्या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात स्वयंसेवकांमध्ये विषाणू विरोधात मोठ्या प्रमाणावर प्रतिकारक शक्ती विकसित झाल्याचे आढळून आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment