औरंगाबाद | दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ग्रामीण भागात ऑक्सिजन ची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची तारांबळ उडाली होती. ऑक्सीजन आभावी अनेक रुग्णांचा मृत्यूदेखील झाला होता. कोरोनाच्या तिसर्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णांची तारांबळ उडू नये म्हणून आता रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यासाठी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे प्रत्येकी तीस बेड उपलब्ध करून दिले जातील.जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच करमाड देवगाव, रंगारी, पिशोर, कन्नड, खुलताबाद, बिडकीन, पाचोड, फुलंब्री, सोयगाव, अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बॅड राहतील.
कोरोनाची दुसरी लाट शहरापेक्षा ग्रामीण भागात वेगाने पसरली होती. गेल्या दीड महिन्यापासून शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही 25-30 रुग्ण दररोज वाढत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटीची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. ऑक्सिजनची गरज पडल्यास रुग्णाला गावाजवळील याच रुग्णालयात उपचार मिळावे, रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्या शहरातील रुग्णालयात शिफ्ट करता यावे, यामुळे रुग्णाच्या जिवाचा धोका आणि मृत्युदरही कमी होईल. यासाठी ग्रामीण भागातही ऑक्सिजनची सुविधा असलेले बेडची सुविधा निर्माण केली जात आहे.