हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, भारतात क्रिकेटची मोठी क्रेझ आहे. क्रिकेट हा फक्त खेळ नव्हे तर भारतात धर्म मानला जातो. त्यातच नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाकडून मुंबईत एका कार्यक्रमावेळी यंदाच्या वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. हे वेळापत्रक जाहीर होताच देशातील हॉटेल आणि विमान तिकिटांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या हॉटेल उद्योगात नाव कमावणारी OYO Rooms या स्टार्टअप कंपनीने क्रिकेट चाहत्यांसाठी नवनवीन हॉटेल सुरु करण्याची घोषणा केली आहे.
५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना होणार आहे. या पहिलाच सामना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होऊ शकते. यावेळी प्रेक्षकांना आरामशीर आणि परवडणाऱ्या दरात हॉटेल्स रूम उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा OYO कंपनीने केली आहे.
यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांची प्रचंड तारांबळ उडाली. हा सामना पावसामुळे 28 मे ऐवजी 29 मे ला खेळण्यात आला होता. एक दिवस पुढे सरकल्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी रेल्वे स्टेशनवर रात्र घालवली होती. त्यामुळे या वर्ल्ड कप मध्ये पुन्हा असं होऊ नये यासाठी ओयो कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
द इकॉनोमिक टाइम सोबत बोलताना कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ओयो कंपनी येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये 500 हॉटेल्स उघडणार आहे ज्यामुळे वर्ल्ड कप ची मागणी पूर्ण होईल. त्याचबरोबर आपलीआवडती क्रिकेट टीम पाहण्यासाठी लांब प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक चाहत्याला आरामदायक आणि परवडणारी अशी राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.
दरम्यान, हा निर्णय फक्त ओयो कंपनीनेच नाही तर MakeMyTrip देखील या वर्ल्डकपसाठी चाहत्यांना आरामदायक हॉटेल देणार असल्याचा दावा केला आहे. जे प्रेक्षकांना त्यांच्या बजेटनुसार हॉटेल शोधून देण्यासाठी मदत करेल . यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये देशातील निवडक शहरात होम स्टे शोधत असून प्रेक्षकांना कमी खर्चात आरामदायी राहण्याचा आनंद घेता येणार आहे असं कंपन्यांनी सांगितलं आहे.