औरंगाबाद – शहरातील विश्वास नगर, लेबर कॉलनी येथील 20 एकर जागेतील शासकीय इमारती धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसल्याने त्यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने 8 नोव्हेंबर रोजी बुलडोजर चालवण्यात येणार असल्याची नोटीस मनपाच्या बांधकाम विभागाने जारी केली आहे. यामुळे तेथील रहिवाशांना आठ दिवसांच्या आत आपल्या सदनिका खाली कराव्या लागणार आहेत.
दिवाळीनंतर प्रशासकीय यंत्रणा पाडापाडीचे फटाके फोडणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या काळात लेबल कॉलनी कॉटर्स बाबत निर्णय झाला होता. परंतु लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ती संचिका धूळखात पडली होती. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सरकारी जागा ताब्यात घेण्यासाठी पाऊल टाकले आहे. शासनाचे मालमत्ता बेकायदेशीरपणे विक्री करून व शासकीय मालमत्तेचे बेकायदेशीर अतिक्रमण करणार्या नागरिकांना विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा नोटीस द्वारे देण्यात आला आहे. नोटीस वर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. खडेकर यांची नावे आहेत.
विश्वासनगरमध्ये 338 सदनिका
विश्वासनगरमध्ये 338 सदनिकाक आहेत. 1953-54 आणि 1980-91 या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या संपूर्ण निवासस्थानांची देखभाल करण्यात येत आहे. 1985 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढलेले आहेत. ते आदेश सर्व न्याय संस्थांनी कायम ठेवले आहेत. 2004 मध्ये बांधकाम विभागाने सदनिका धारकांना नोटीस बजावली होती. येथील इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले आहे. त्यामुळे या इमारती पाडाव्या लागणार आहेत. नोटीशीत तसा उल्लेखही केला होता. मात्र अद्याप येथील नागरिकांनी त्यावर अंमलबजावणी केलेली नाही.