हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून १५ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका व नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीने सई परांजपे यांच्या नावाची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी लतिका पाडगांवकर (पुणे) तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे.
पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.
मागील चार दशकांहून अधिक काळापासून सई परांजपे या भारतीय सिनेजगतात कार्यरत असून त्यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी सिनेमांनी भारतीय सिनेजगताला वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे. अतिशय भावस्पर्शी, मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्पर्श (१९८०), चश्मेबद्दूर (१९८१), कथा (१९८३), दिशा (१९९०), चुडिया (१९९३), साज (१९९७) यांचा समावेश आहे. चित्रपट दिग्दर्शनासमवेत परांजपे यांनी अनेक महत्वपूर्ण नाटकांचे व बालनाट्यांचे देखील दिग्दर्शन केलेले आहे. तसेच त्यांनी मराठी साहित्यात विपुल प्रमाणात लेखन केले असून प्रामुख्याने बालसाहित्याचा त्यात समावेश होतो. २००६ साली भारत सरकारने परांजपे यांना त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे. तसेच फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी या केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण संस्थेवर देखील परांजपे यांनी सलग दोनदा अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.
नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा केंद्रीय सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. सॉलीटेअर टॉवर्स, अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अॅकॅडमीक पार्टनर आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात अधिकाधिक रसिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, अमित पाटील आदींनी केले आहे.