हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने काल मध्यरात्री पाकिस्तानच्या POK मध्ये हवाई हल्ला केला. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर मधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त करत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी एनएसएने भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी रात्री उशिरा हि बातचीत झाल्याच बोललं जातंय.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी असीम मलिक यांच्या अजित डोवाल यांच्याशी झालेल्या संभाषणाबाबत एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. टीआरटी वर्ल्ड या वृत्तवाहिनीच्या हवाल्यानुसार, , दार यांनी स्वतः सांगितले की भारत आणि पाकिस्तानमध्ये एनएसए पातळीवर संपर्क स्थापित झाले आहेत. ही दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. मात्र, या फोन कॉलची पुष्टी भारत किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही अधिकृत यंत्रणेने अद्याप केलेली नाही. खरं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून कोणत्याही पातळीवर चर्चा झालेली नाही. दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत भारताचे स्पष्ट धोरण असे आहे. म्हणूनच केंद्रातील मोदी सरकारने प्रत्येक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकला आहे. मात्र आता अजित डोवाल यांच्यासोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संपर्क साधल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी-
दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना भारताला इशारा दिला आहे. भारताने रात्रीच्या अंधारात आमच्यावर हल्ला केला. परंतु अल्लाहच्या कृपेने आमचं सैन्य त्यांना चोख उत्तर देऊ शकलं. भारताला या कारवाईचे परिणाम भोगावे लागतील, आदल्या रात्री जी चूक केली त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल. आम्ही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल असे म्हणत पाकिस्तानने भारताला काही तासाताच प्रत्युत्तर देत बॅकफूटवर ढकलल्याचा दावाही शरीफ यांनी केला. तसेच पाकिस्तानी लष्कराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आम्हाला अभिमान असल्याचं शहबाज शरीफ यांनी म्हटलं.




