साधुसंतांच्या महाराष्ट्रात साधूंचीच हत्या, आरोपींना ६ महिण्यात फासावर लटकवा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे, परंतु येथे साधूंचीच हत्या होत असेल तर अत्यंत चिंताजनक बाब आहे असे म्हणत आरोपींना ६ महिण्यांच्या आत फासावर लटकवा अशी मागणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

पालघर मध्ये जमावाने साधूंना केलेली मारहाण, तिथे उपस्थित असलेले पोलीस आणि साधूंची झालेली हत्या हे सर्व प्रकरण लॉक डाऊन मध्ये घडते. सोशल मीडियात पालघर येथील मारहाणीचा जर हा व्हिडीओ व्हायरल झाला नसता तर सत्य परिस्थिती कधीच समोर आली नसती. नेमकी कशामुळे आणि का मारहाण झाली हे सत्य समोर उशिरा येईल परंतु साधूंना अशाप्रकारे मारहाण करणे एकदम चुकीचे आहे असे मत देसाई यांनी व्यक्त केले आहे. तसेच साधूंना मारहाण करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना लॉकडाऊन संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत फासावर लटकवा अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी असे देसाई यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पालघर माॅब लिंचिंग प्रकरणी ११० आरोपींना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच याप्रकरणात अटल करण्यात आलेल्यांमध्ये बहुतांश जण हे भाजपचेच असल्याचंही म्हटले जात आहे.

You might also like