औरंगाबाद | नाशिक महामार्गावरील माळीवाड्यात दवाखाना उघडून पेशन्टवर उपचार करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पकडले आहे. शुक्रवारी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
वासुदेव गोपाल बाला वय 27 वर्षे (रा. बाजारसावंगी) असे बोगस डॉक्टरांचे नाव आहे. हा बाजारसावंगी येथे वास्तव्यास होता. त्याला दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोग्य विभागाला अशा डॉक्टरांना शोधून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याद्वारेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी बामणे, आर एस वैष्णव, उल्का बनसोडे, एम. पी. कांबळे आणि मनीष फुलारे यांनी माळीवाड्यातील राजस्थानी बँकेखाली असलेल्या राजू हेकडे यांच्या इमारतीत छापा मारला आहे. त्याठिकाणी वासुदेव रुग्णांवर उपचार करत होता.
त्याच्याकडे ऍलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांचा साठा सापडला. याप्रकरणी तपास करत त्याला आरोग्य अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. नंतर त्याला दौलताबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बोगस डॉक्टर विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.