हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pandharpur Tirupati Train । देवदर्शन करणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील अनेक दिवसापासून पंढरपूर ते तिरुपती बालाजी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी भाविकांकडून केली जात होती. अखेर या रेल्वेला ग्रीन सिग्नल मिळाला असून १३ डिसेंबरपासून हि ट्रेन चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगांवकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. विठुरायाचे भक्त आणि तिरुपती बालाजीच्या भाविकांसाठी हि ट्रेन वरदान ठरणार आहे. तसेच देशातील हि २ प्रमुख तीर्थक्षेत्रे या नव्या रेल्वेमुळे जोडली जाणार आहेत.
कसे असेल वेळापत्रक – Pandharpur Tirupati Train
दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गाडी क्रमांक ०७०१२ आणि ०७०१३ क्रमांकाची पंढरपूर–तिरुपती रेल्वेगाडी लातूर व्हाया चालवण्यात येणार आहे. ही एक साप्ताहिक रेल्वेगाडी असेल. 3 डिसेंबर पासून सुरू होणारी हि रेल्वे 28 डिसेंबर पर्यंत चालवली जाईल. तिरुपती – पंढरपूर साप्ताहिक स्पेशल ट्रेन 13 डिसेंबर पासून प्रत्येक शनिवारी सायंकाळी चार वाजून 40 मिनिटांनी तिरुपती रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी काचीगुडा, सिकंदराबाद, बिदरमार्गे दुस-या दिवशी म्हणजे दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी लातूर स्थानकावर पोहचेल आणि संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पंढरपूर स्थानकात पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासात हि रेल्वेगाडी प्रत्येक रविवारी रात्री आठ वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी लातूर रेल्वे स्थानकावर पोहचेल तर दुस-या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री १०.३० वाजता तिरुपती स्थानकावर पोहचेल. Pandharpur Tirupati Train
या रेल्वेमध्ये एक एसी प्रथमवर्ग, एक एसी फर्स्ट कम-टू-टीअर , दोन एसी-टू-टीअर, ६ एसी थ्री टीअर, ९ स्लीपर क्लास, दोन द्वितीय श्रेणी कम दिव्यांग एसएलआर असे एकूण २३ डबे असतील. पंढरपूर ते तिरुपती ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर यापुढेही या रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या जातील असं म्हंटल जातंय. प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर या गाडीची पुढील रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.




