हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “पंढरपूरच्या वारीचा अनुभव मला माणूस म्हणून खूप समृद्ध करणारा आणि अनेक अध्यात्मिक अनुभव देणारा होता,अशी वारी संदर्भात आठवण पिंपरी – चिंचवड महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती अतुल नानासाहेब शितोळे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलताना जागवली.
अतुल नानासाहेब शितोळे हे २०१३ पासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात.पण गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे पायी वारीवर काही बंधनं आली आहेत.या विषयी आम्ही काही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया,आठवणी जाणून घेत आहोत.त्याच मालिकेत आम्ही अतुल शितोळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
वारीच्या आठवणी विषयी आणि एकंदरीत त्यांच्या अध्यात्मिक जडण – घडणीविषयी बोलताना शितोळे म्हणाले की “तसा अध्यात्मिक वारसा आमच्या घरात मला माझ्या मातोश्रीकडून मिळाला.माझी आई खूप धार्मिक.तिची देवा – धर्मावर विशेष श्रद्धा.त्यामुळे नकळत माझ्यावर देखील ते अध्यात्मिक संस्कार होत गेले.कदाचित त्याचं संस्कारामुळे मी वारी करू शकलो असं मला वाटतं.
मुळात २०१३ साली फक्त एक दिवस चालायचं म्हणून मी आणि पत्नी मीना आम्ही वारीत गेलो होतो.पण शेवटी सगळी त्याचीचं कृपा.त्या अध्यात्मिक वातावरणाची मला एवढी गोडी लागली की आम्ही थेट ८ दिवस पायी चालतं वारी पूर्ण करून आलो.आम्ही वारी करून आल्याचा माझ्या वडिलांना स्वर्गीय आदरणीय नानासाहेब शितोळे यांना प्रचंड आनंद झाला होता.
सोबतच या वारीत अहंभाव नाहीसा करणारे अनेक किस्से घडले.एक आठवण जरूर सांगावीशी वाटते. आमच्यासोबत एक मित्र वारीला यायचा.दुर्दैवाने त्याच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं.वडिलांच्या जागीच त्याला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार होती पण त्याचं “जॉइनिंग लेटर” काही केल्या लवकर येत नव्हतं.त्यामुळे तो थोडा नाराज होता.
वारीच्या आठव्या दिवशी आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं.त्याच दिवशी त्याला घरून फोन आला की त्याचं “जॉईनींग लेटर” घरी आलंय आणि योगायोग म्हणजे ते लेटर आणून देणाऱ्या पोस्टमनचं नाव हे “विठ्ठल” होतं. म्हणजे हे सगळं दैवी आहे.असे अनेक किस्से ते आपण फक्त अनुभवू शकतो.पण शब्दात सांगू नाही शकतं. वारी विषयी मी फक्त हेच म्हणू शकतो “वारी म्हणजे विलक्षण अनुभवांचा खजिना” होय.दोन वर्षापासून वारीवर बंधनं आली आहेत.पण लोकांच्या सुरक्षेसाठी ते देखील गरजेचं आहे.दरवर्षी आम्ही विठ्ठलाच्या भेटीला जायचो.यंदा “तोची आमच्या भेटीस आला” अशी आमची भावना आहे.