पाणी फाउंडेशन : १ ल्या नंबरसाठी गाव लागल कामाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे,

लोकसभा निवडणुकी राजकीय धग अजून काही गावात शिल्लक आहे. आडवा आडवी, जिरवा जिरवीचे उद्योग सुरू आहेत. तासगाव तालुक्यातील राजकारण तर सगळ्या राज्याला परिचयाच. पण याच तालुक्यातील हातनोली गावात पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेने गावातील सर्व राजकीय वाद मिटवून गावाचे मनसंधारण झाले आहे. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत आपला गाव प्रथम येण्यासाठी गावाने कामाचा धडाका लावला असून गट बाजूला ठेवून गाव राबत आहे. या कामासाठी गावातील महिला वर्गाचा सहभाग हा लक्षणीय आहे.

८ एप्रिल रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेची सुरुवात गावकऱ्यांनी गावातून भजन करत फेरी काढून सुरुवात केली. सध्या रोज पहाटे प्रत्येकाच्या घरी निरोप देऊन श्रमदानाला येण्याचे आवाहन केले जाते. पहाटे सहा ते आठ व सायंकाळी चार ते सहा या वेळेत काम केले जाते. गावात सध्या यांत्रिकीकरणातून ७० हजार घनमीटर काम झाले आहे. तर श्रमदानातून सोळाशे घनमीटर काम झाले आहे. यामधून बांधबंदिस्ती, शेततळे, विहीर पुनर्भरण, सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढणे, सलग समतल चर या कामांचा समावेश आहे. अंतिम दिवसापर्यंत आम्ही सर्व काम करून पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळवणारच असा चंग गावानं बांधलाय. श्रमदानातून सर्वांचं मानसंधारण झाल्याचे पाणी फौंडेशनच्या टीमने सांगितले.

पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत शोषखड्डे व सांडपाण्यावर परसबागा यापैकी दोन्हीतील एक काम करण्यासाठी गुण आहेत. २ हजार १२२ लोकसंख्या असणाऱ्या या गावाला ३३३ परसबागा किंवा शोष खड्डे करण्याचे टार्गेट आहे. मात्र या गावाने सुंदर अशा १५० परसबागा तयार केल्या आहेत. सांडपाण्यावर असणाऱ्या परसबागेत केळी, वांगी, भाजीपाला, आंबा, चिकू, यांसह अनेक फुलझाडांची लागवड केली आहे. तासगाव तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच गावात आबा व काका गटाचा राजकारण होत. मात्र पाणी फाउंडेशनच्या कामासाठी आबा, काका व भाजप, राष्ट्रवादी असा कोणताही गट न ठेवता भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून पाणी फाउंडेशन साठी राबत आहेत. ज्या हाताने दगड उचलून एकमेकांची डोकी फोडली तेच हात आज पाणी जिरवण्यासाठी एकमेकांच्या हातात दगड देत त्याचा बांध घालताना दिसत आहेत. हातनोलीची ही राजकीय तंटामुक्ती अनेक गावांसाठी नक्कीच आदर्श आहे.

Leave a Comment