परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
पाथरी शहरात नियमीत गस्तीवर असणार्या स्थानिक पोलीसांनी आज पहाटे प्रतिबंधित गुटख्याने भरलेला एक ट्रक पकडला. या ट्रकची तपासणी केली असता यात तब्बल २२ लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. या कारवाईनंतर राज्यात बंदी असलेला गुटखा परभणी जिल्ह्यामध्ये खुलेआम विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या गुटखा माफियांचे धाबे आता दणाणले आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, आज शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंगवर असणाऱ्या जाधव, करे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयितरीत्या आढळलेल्या एका ट्रकची पाहणी व चौकशी केली असता, त्यामध्ये गुटख्याने भरलेल्या सत्तावीस बोऱ्या मिळून आल्या. एका बोऱ्यात सहा बॅग याप्रमाणे १६२ बॅग गोवा कंपनीचा गुटखा आढळून आला आहे. ज्याची अंदाजे किंमत २२ लाख रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
पाथरीतली ही गुटख्याची सर्वात मोठी कार्यवाही मानली जात असून या कारवाईने गुटखा माफीयांचे धाबे धाबे दणाणले आहे. या कारवाईनंतरही हा गुटखा कोठून आला व तो कोणत्या व्यापाऱ्याकडे दिला जाणार होणार होता ? याबाबतची माहिती पोलीस व अन्न प्रशासन विभागाच्या चौकशीतच समोर येणार आहे.