कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी गावोगावी होणार ग्राम सुरक्षा दलाची स्थापना; परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद स्वतंत्र विहित नोंदवहीमध्ये वेळोवेळी करणे आणि प्रत्येक व्यक्ती अधिकृतपणे आणि सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीसह गावात प्रवेश करत आहे याची खात्री करण्यासाठी या ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक गावात संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, त्या तालुक्याचे तहसिलदार व संबधित तालुक्याच्या पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांचा सदस्य म्हणून समावेश असलेली ग्रामसुरक्षा दल निवड समिती स्थापन करण्यात येईल. या समितीमार्फत एकमेकांच्या समन्वयाने ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांची निवड करून १० किंवा जास्त व्यक्तींचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येतील. ग्रामसुरक्षा दल निवड समितीकडून ग्रामसुरक्षा दलातील सभासदांची निवड करतांना ते स्वेच्छेने काम करणारे स्वयंसेवक असतील व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसेल आणि ते कोणत्याही समाज विघातक संघटनेशी संबधित नसतील आणि समाजात त्यांना मान आणि प्रतिष्ठा असेल याची आधी सुनिश्चिती करण्यात येणार आहे.

ग्रामसुरक्षा दलात गावातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, हिंदू , मुस्लिम अशा विविध जाती – जमाती आणि धर्माच्या व्यक्तींचा समावेश असेल. ग्रामसुरक्षा दलातील सभासदांची वयोमर्यादा २५वर्ष ते ४५ वर्ष यापेक्षा जास्त असणार नाही . ग्रामसुरक्षा दलातील ज्येष्ठ व्यक्ती दलाचा अध्यक्ष म्हणून काम करतील. ग्रामसुरक्षा दलातील एकूण व्यक्तीपैंकी आवश्यक तितक्या व्यक्तींचे समूह तयार करण्यात येतील आणि हे समूह आळीपाळीने 24 तास कार्यरत राहतील. ग्रामसुरक्षा दलातील व्यक्तींना विहीत नमुन्यात संबंधित पोलिस ठाण्याच्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत ओळखपत्र देण्यात येईल. यानुसार ग्रामसुरक्षा दलाची रचना असणार आहे. असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी कळविले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment