परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील नागरी वसाहतीसह तीन ते पाच किमीच्या परिसरात तीन दिवसासाठी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी महानगरपालिका हद्द आणि ५ किमी परीसर तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिका व नगर पंचायतीच्या हद्दीत तसेच लगतच्या ३ किमी परिसरात कलम १४४नुसार गुरुवार दि. २ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून ते दि. ५जुलै रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश परभणीचे जिल्हादंडाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढले आहेत.
यांना असणार सुट ….
या संचारबंदीतुन सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक , वार्ताहर , प्रतिनिधी , वितरक तसेच पेट्रोलपंप वितरक , कर्मचारी व त्यांची वाहने आणि दुध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून सकाळी ६ ते ९ या वेळेत दूध विक्री करावी. कृषी बी-बियाणे, खते वाहतूक त्यांची गोदामे व दुकाने तसेच त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार आणि कापूस खरेदी केंद्र, राष्ट्रीयकृत बँका रास्त भाव दुकानदारांकडून चलनाद्वारे पैसे भरणा करण्यासाठी आदी व्यक्ती, समुहाला सुट देण्यात आलीय.
उल्लंघंन केल्यास होणार कारवाई….
वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेशिवाय नागरी भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारात, गल्लीमध्ये , घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २oo५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येऊन आणि पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक परभणी, सर्व उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी , सर्व तालुका दंडाधिकारी यांच्यावर राहील. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.