परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
ग्रामीण व शहरी भागात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परभणीकरांची धडधड वाढली आहे. दोन्ही रुग्णांचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्ण सापडलेले गाव व परिसर सील करण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सदरील महिला सोनपेठ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरील महिला काही दिवसांपूर्वी मुंबई येथून शेळगाव या गावी राहण्यासाठी आली होती. सदरील महिलेला कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आता या गावांमध्ये तीन दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे व गाव सील करण्यात आले आहे.
आज सकाळी परभणीतील साखला भाग परिसरामध्ये पुणे येथुन आल्यानंतर राहणाऱ्या तरुणाचा स्वॅब तपासणी अहवाल, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी मनपाला दिले आहेत. याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या आठ झाली असून पैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू नांदेड येथे उपचार घेत असताना झाला असून दुसरा रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. आता हे सहा रुग्ण शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान जिल्हात सोमवार दि. १८ मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्वीचे १३६९ व काल दाखल ४० अशा एकूण १४०९ संशयित रुग्णांची नोंद झाली असुन काल सायंकाळपर्यंत ४३ जणांचे तपासणी अहवाल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.