परळीमध्ये गुट्टे कुटुंब निकालात निर्णायक ठरणार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुणाचाबी नाद करायचा… पण शरद पवारांचा सोडून… असं म्हणायची वेळ लोकसभेला आली… भलेभले नादाला लागले… आणि बाद झाले… अनेक मातब्बर भुईसपाट झाले… या वादळात पंकजा मुंडेही सापडल्या… बालेकिल्ल्यातच पराभवाची नामुष्की साहेबांमुळे पंकजाताईंवर आली… बीडमध्ये बराच राडा झाला… शरद पवारांनी सांगून तुतारीचा आवाज लोकसभेला काढला… पण आता वेळ आहे ती विधानसभेची… आता शरद पवारांचं नेक्स्ट टार्गेट असणार आहेत धनंजय मुंडे… ज्यांच्या विजयासाठी पवारांनी 2019 ला ताकद लावली आता त्याच धनुभाऊंना आमदारकीला पाडण्यासाठी शरद पवारांनी तीन नेत्यांवर डाव टाकलाय… परळी सारख्या बालेकिल्ल्यातच धनु भाऊंना घाम फोडणारे ते चार चेहरे नेमके कोण आहेत? त्यांचे राजकारणातील प्लस मायनस काय आहेत? आणि यापैकी नेमक्या कोणत्या चेहऱ्यावर उमेदवारीचा शिक्का पवार मारू शकतात? त्याचीच ही इन साईड स्टोरी…

2009 मध्ये पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा मतदारसंघ सोडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले… त्यामुळे पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांचं आमदारकीला लॉन्चिंग झालं… त्यांनी काँग्रेसच्या प्रा. टी. पी. मुंडे यांचा पराभव करून दणक्यात विजय मिळवला… खरंतर याच वेळेस धनंजय मुंडे विधानसभेसाठी इच्छुक होते… पण सत्ता संतुलन करण्यासाठी धनुभाऊंना विधान परिषदेवर घेण्यात आलं… पण या भाऊ बहिणींमधला राजकीय विस्तव वाढत गेला… तो थेट धनुभाऊंचा राष्ट्रवादीतील प्रवेश होण्यापर्यंत… 2010 ते 2012 या दरम्‍यान धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मध्ये अनेक विषयावरून खटके उडाल्याचं उभ्या राज्याने पाहिलं… याच विस्तवातून मुंडे विरुद्ध मुंडे, बहिण विरुद्ध भाऊ, पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी 2014 ची विधानसभा निवडणूक झाली… मात्र 26 हजार 184 इतक्या भरघोस लीडने पंकजाताईंनी बाजी मारलीच… अर्थात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा पंकजाताईंना झाल्याचंही यावेळेस बोललं गेलं…

परळीमध्ये, गुट्टे कुटुंब निकालात निर्णायक ठरणार । Parli Vidhan Sabha

पण तत्कालीन कॅबिनेट मंत्री असतानाही… भाजप सत्तेवर असतानाही… पंकजा मुंडेंचा गेम झाला… आणि धनुभाऊ परळीतून आमदार झाले… थोडक्यात परळी विधानसभा मतदारसंघ नुसता हाय व्होल्टेज नाही.. तर मुंडे घराण्याचा…ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचा… राष्ट्रवादी विरुद्ध भाजप वादाचा सेंटर पॉईंट ठरला… पण यानंतर पंकजाताईंना पक्षातूनच डावललं जाणं… राष्ट्रवादी फुटणं… पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्यात सलगी होणं… महायुती म्हणून एकाछताखाली येणं… पंकजा ताईंना लोकसभेची उमेदवारी मिळणं… आणि नामुष्की होत खासदारकी हरणं… या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून परळीचं राजकारण आतून बाहेरून ढवळून निघालं… मराठा आणि वंजारी यांच्यातला संघर्ष टोकाला गेला… मराठा आरक्षणाची झळ पंकजा मुंडेंना बसली पण परळी विधानसभेतील संघर्षाची आग मात्र अजूनही धूमसत आहे… हे सगळ सुरू असताना विधानसभेची चाहूल लागल्याने परळी हा जिल्ह्याचा नाही तर राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे… पंकजाताईंची विधान परिषदेवर वर्णी लागल्यामुळे आता महायुतीकडून धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे… पण लोकसभेला करिष्मा करून दाखवणाऱ्या पवारांनी आता विधानसभेला धनुभाऊंना त्यांच्याच होम पिचवर मात देण्यासाठी आता एक नवा डाव खेळलाय… शरद पवार या तीन मोहऱ्यांवर नशीब आजमावून यापैकी एकाला डन तर करतीलच… पण यातल्या एकाला निवडून आणण्याची धमकही या उमेदवारांमध्ये आहे… मुंडेंच्या परळीतल्या वर्चस्वला शेवटचा हदरा देण्याचा चान्स शरद पवार काही केल्या सोडणार नाही, एवढं मात्र नक्की…

यातलं पहिलं नाव येतं ते सुदाताई गुट्टे यांचं…. यंदा काहीही झालं तरी परळीतून धनंजय मुंडेंना पाणी पाजणारच… असं ठासून सांगणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ सुदाताई गुट्टे… शरद पवारांशी उत्तम संपर्क असणाऱ्या डॅशिंग आणि निर्भीड नेत्या म्हणून सुदाताई गुट्टे यांनी ओळख… शिक्षण संस्था – कारखानदारी या माध्यमातून त्यांचा मतदार संघावर प्रभाव राहिला आहेच… पण शरद पवार गटात असल्याने वंजारी प्लस मराठा असं दुहेरी जातीय गणित त्यांच्या फायद्याचे ठरणार आहे… धनुभाऊंना निवडणुकीच्या धामधुमीत जशास तस, खमक्या भाषेत प्रत्युत्तर देण्याची हिंमत सुदाताई गुट्टे यांची आहे… त्यामुळे पवार सध्या तरी त्यांच्या नावाबाबत पॉझिटिव्ह मोडवर आहेत, असं बोलायला हरकत नाही…

शरद पवारांचा दुसरा मोहरा येतो तो राजेसाहेब देशमुख यांचा… राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे… जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत त्यांनी तळागाळापर्यंत आपला जनसंपर्क वाढवलाय… मागच्या तीस वर्षांपासून एकाच पक्षात सक्रिय राजकारणात असल्यामुळे काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार म्हणून त्यांना ओळखलं जातं… अगदी जिल्हा परिषदेचे शिक्षण व कृषी सभापती असताना त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही जनतेच्या मनावर उमटला आहे… जनतेच्या सुखदुःखात मिसळल्यामुळे लोकनेता म्हणूनही त्यांची ओळख आहे… त्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जिल्ह्यात आणि पर्यायाने मतदारसंघात बळ देण्यात देशमुख यांचा मोठा वाटा राहिलाय… त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी या लाईन अपने परळीची निवडणूक न्यायची असेल तर महाविकास आघाडी देशमुखांच्या नावाचा सिरियसली विचार करू शकते… फक्त ही जागा राष्ट्रवादीची असल्याने उमेदवारी मिळवायची असेल तर देशमुखांना पक्ष बदलावा लागेल… पण ते याला तयार होतील का? यावर पुढचा सगळा डोलारा अवलंबून आहे… पण सध्यातरी पक्ष आणि चिन्ह हे त्यांच्यासाठी येणाऱ्या विधानसभेला अडचणीत टाकणाऱ्या गोष्टी आहेत…

तिसरं नाव बबन गीते यांचं… मुंडेंच्या सावलीत ज्यांचं राजकारण वाढलं ते गीते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मात्र आधी पंकजाताईंच्या बाजूने आणि नंतर धनुभाऊंच्या बाजूने गेले… पण हे करत असताना त्यांनी आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व कधीही संपू दिलं नाही…. म्हणूनच लोकसभेच्या धामधुमीत जेव्हा बबन गीते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या… बबन गीते यांनी लोकसभेला तर काम फत्ते करून दाखवलं… पण आता आमदारकीसाठी ते प्रयत्न करत आहेत… उमेदवारीच्या स्पर्धेत त्यांचंही नाव फ्रंटला आहेच… पण गुंडगिरी, खून आणि मोक्काचे दाखल झालेले गुन्हे यामुळे शरद पवार बबन गीते यांना उमेदवारी देतील का? हा प्रश्न आहेच… पण पैसा खर्च करण्याची ताकद… आरेला का रे म्हणण्याची हिंमत… आणि वंजारी समाजाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची गीते यांची ताकद पाहता त्यांना परळीत हलक्यात घेऊन चालणार नाही, एवढं मात्र नक्की…

आता आपण बोलूयात शेवटच्या नावाबद्दल ते म्हणजे रत्नाकर गुट्टे… तसं पाहायला गेलं तर रत्नाकर गुट्टे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासप पक्षाकडूनचे उमेदवार… 2019 ला जेलमध्ये राहूनही निवडणूक लढवून ते जिंकले… यावरून त्यांच्या पॉलिटिकल ताकतीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो… विकासकामांच्या बाबतीत रत्नाकर गुट्टे चोख असतात… युती सरकारचा पुरेपूर वापर करून घेत त्यांनी भरीव निधी मतदार संघासाठी खेचून आणला… रोजगार मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून गुट्टे हे मतदारसंघात सक्रिय आहेत… त्यांच्या गंगाखेड शुगर मिल कारखान्याचे कार्यक्षेत्र अगदी परळीतही असल्याने गुट्टे सध्या गंगाखेड किंवा परळी या दोन जागांसाठी निवडणूक लढवू इच्छित आहेत… मनी – मसल पॉवर या सगळ्याचा विचार केला तर ते एन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात… पण ती कधी आणि कशी यावर आत्ताच अधिक भाष्य करणं तसं चांगलं राहणार नाही…बाकी अजितदादांचा खासमखास माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनुभाऊंना चितपट करण्यासाठी आता शरद पवार या चौघांपैकी कुणाच्या हातात तुतारी देणार? हे तर येणारा काळ ठरवेलच… तुम्हाला काय वाटतं? यंदा परळी मध्ये आमदारकीचा गुलाल कुणाचा? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…