पाटण न्यायालयाचा निकाल : हलगर्जीपणाने गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत एकास सहा महिने कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | हलगर्जीपणाने भरधाव वेगाने गाडी चालवून पापर्डे, (ता. पाटण) येथील सुनील महादेव देसाई यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कोल्हापूर येथील मृत्यूंजय बळीराम शिंदे (वय 58) याला पाटणचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रणदिवे यांनी 6 महिने साधी कैद व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 नोव्हेंबर 2015 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास विहे, ता. पाटण गावच्या हद्दीत कराड ते चिपळूण रोडवर चांभार्की नावच्या शिवाराजवळ कोल्हापूर, अंबाई टेकसमोर रंकाळा तलाव येथील मृत्यूंजय बळीराम शिंदे (वय 58) याने भरधाव वेगाने, हयगयीने, अविचाराने, रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या ताब्यातील स्कॉर्पियो (क्र. एम. एच. 09 सी. एक्स. 36) गाडीने सुनील महादेव देसाई (रा. पापर्डे, ता. पाटण) यांना जोराची धडक दिली होती. या अपघातानंतर जखमी देसाई यांना हॉस्पीटलमध्ये घेवून न जाता तेथेच सोडून व पोलिसांना अपघाताची माहिती न देता गाडी चालक पळून गेला होता.

याबाबतची तक्रार प्रमोद प्रकाश देसाई (वय 30) यांनी पाटण पोलिसात दिली होती. याचा तपास सपोनि मोकाशी यांच्याकडे होता. बुधवार दि. 6 रोजी पाटणच्या न्यायालयात यावर सुनावणी झाली. यावेळी पाटणचे न्यायदंडाधिकारी रणदिवे यांनी आरोपी गाडी चालक मृत्यूंजय बळीराम शिंदे (वय 58, कोल्हापूर) याला सुनिल महादेव देसाई (पापर्डे, पाटण) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादवि 304 (अ) कलमान्वये 6 महिने साधी कैद व 2 हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास पुन्हा एक महिना साधी कैद, भादवि 279 नुसार एक महिना साधी कैद, 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद, 134 (अ) (ब) नुसार एक महिना साधी कैद व 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून श्रीमती डी. बी. मोहिते यांनी कामकाज पाहिले.

Leave a Comment