साताऱ्यातील पाथरपुंज जागतिक पर्यटनकेंद्र बनणार; सह्याद्रीच्या कुशीत लुटता येणार निसर्गसौंदर्याचा आनंद

Shambhuraj Desai On Patharpunj (3)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा जिल्ह्याचं नाव आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरलेल्या आणि मागच्या काही वर्षात देशातील पावसाची जणू नवीन राजधानी बनलेल्या पाथरपुंज (Patharpunj) गावाला आपण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणणार आहोत अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. हॅलो महाराष्ट्राने पाथरपुंज या गावावर आणि तेथील निसर्गरम्य वातावरण, पावसाचे प्रमाण यावर केलेल्या एका विशेष डॉक्युमेंट्रीवर बोलताना शंभूराज देसाई यांनी हि माहिती दिली. तसेच त्यासाठीचा रोडमॅप कसा राहिल हे सुद्धा शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.

पाथरपुंज हे गाव अजून बऱ्याच लोकांना माहित नाही… अशावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर, पर्यटन संचालनाच्या वेबसाईटवर, अगदी देशाचे जे पर्यटन विभाग आहे त्यांच्याशीही लिंकिंग करून पाथरपुंज हे गाव जागतिक नकाशावर आणण्याचे माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने १-२ बैठकही झाल्या आहेत अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली. सध्या पाथरपुंजला जायला रस्ता आहे, परंतु तो कच्चा रस्ता आहे. बऱ्याच वेळा तिथे चारचाकी घेऊन जाताना व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामुळे काही निर्बंध आहेत. पण इकोफ्रेंडली गाड्या घेऊन लोकांच्या त्याठिकाणी पाहणी करता येईल. यादृष्टीने आराखडा बनवायच्या सूचना मी वनविभागाला आणि आमच्या पर्यटनाला दिल्या आहेत असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत मी सांगितलं आहे. ते सुद्धा यासाठी आग्रही आहेत. येत्या महिन्यात किंवा २ महिन्यात आमचं प्राथमिक प्रारूप तयार होईल अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

एकदा का पाथरपुंजचा चेहरामोहरा बदलला आणि पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलं कि, सातारा जिल्ह्याला नवीन पर्यटन स्थळ मिळेल. याठिकाणी पावसाळ्यात तुम्ही मनसोक्त पावसाचा आनंद घेऊ शकता.. सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या अद्भुत निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटू शकाल. इथल्या निसर्गसह खाद्यसंस्कृतीची चव चाखण्याची संधी पर्यटकांना मिळेल. एकूणच काय तर पर्यटनाच्या दृष्टीने पाथरपुंज हे फक्त सातारच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.