हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Patharpunj । मित्रानो, भूगोलाच्या पुस्तकात भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण चेरापुंजी असं आपण शिकलो आहे. मात्र आता महाराष्ट्रातील पाथरपुंज या गावात भारतातील सर्वाधिक पाऊसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणच्या कुशीत वसलेलं या गावात सर्वात जास्त पाऊस कसा काय पडतो? पाथारपुंजची भौगोलिक परिस्थिती नेमकी आहे तरी कशी ज्यामुळे वरुणराजाची कृपा सतत या परिसरावर असते हे जाणून घेण्यासाठी हॅलो महाराष्ट्राची टीम थेट पाथारपुंजला पोचली …. आणि मागोवा घेतला इथल्या निसर्गाचा… निसर्गात लपलेल्या वातावरण निर्मितीचा… अनुभव घेतला पाथारपुंजमध्ये कोसळणाऱ्या धो धो सरींचा… हॅलो महाराष्ट्राची हीच डॉक्युमेंट्री तुमच्या समोर आज ठेवतोय….
तर मित्रानो, पाथरपुंज या गावाचे भौगोलिक स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलले हे गाव पाटण तालुक्यात असले तरी सातारा, सांगली आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. येथील काही घरे तिन्ही जिल्ह्यांमध्ये विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर असूनही, येथे पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट वारणा धरणात जमा होते, ज्यामुळे वारणा धरण भरण्यामध्ये या गावाचा मोठा वाटा आहे.
पाथरपुंज मध्ये का पडतो इतका पाऊस? Patharpunj
पाथरपुंज मध्ये पाऊस इतका जास्त आणि प्रचंड पडतोय कि गावातील कमान हि पाण्याने शेवाळलेले आहे…. त्यामुळे गावाचे नावही कमानीवर दिसत नाही. समुद्रातील बाष्पीभवन घेऊन येणारे जे काही ढग आहेत, ते ढग सह्याद्रीला धडकतात आणि पाणी खाली पाडतात. यावेळी वाऱ्याचा जोर हा इतका प्रचंड असतो कि पाऊस आडवा तिडवा कसाही पडतो. जोपर्यंत ढगातील पाणी संपत नाही तोपर्यंत पाऊस पडत असतो. त्यामुळे दरवर्षी पाथरपुंजमध्ये मुसळधार आणि धुव्वाधार पाऊस कोसळतो. २०१९ पासून पाथरपुंज मध्ये सातत्याने सार्वधिक पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाची आकडेवारी सांगते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, खास करून जुलै महिन्यात पाथरपुंजमध्ये सतत पाऊस पाहायला मिळतो. स्थानिक सांगतात कि एकेकाळी पाथरपुंजला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायचा कि रेड्याच्या अंगावरचं कातडे जायचं…
यावर्षी १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये (Patharpunj ) तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान, मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. फक्त मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन-
महत्वाची बाब म्हणजे पाथरपुंज हे गाव (Patharpunj) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये येते… साहजिकच जंगली प्राण्यांचा वावरही याठिकाणी पाहायला मिळतो. वारणा नदीचा उगमही याचा पाथरपुंज गावात होतो. सह्याद्रीत भयंकर पाऊस पडत असल्याने पावसाचे काही पाणी डोंगरावरून वाहून जाते तर काही पाणी जमिनीत मुरते. जमिनीत मुरलेले पाणी सह्याद्रीचा डोंगर त्याच्या पोटामध्ये साठवून ठेवतो.. कालांतराने हे पाणी झऱ्यांच्या माध्यमातून हळूहळू बाहेर पडते. अनेक ठिकाणी आपल्याला पाझर बघायला मिळतात…. नदीचा उगम हा अशाच पाझरामधून झालेला असतो. पाथरपुंजच्या २ किलोमीटर मागील बाजूला एक पाझर आहे, त्या पाझरातून वारणा नदीचा उगम झाला असं म्हंटल जाते. पाथरपुंजचे निसर्गरम्य वातावरण आणि मागच्या काही वर्षातील पावसाची आकडेवारी बघितली तर पाथरपुंज हे देशातील पावसाची नवी राजधानीच ठरली आहे असं म्हंटल तरी ते चुकीचं ठरणार नाही…




