घाबरु नका, All is Well | कोरोनाशी लढून जिंकलेल्या ६ माणसांच्या जिद्दीची गोष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोविड- १९ चा गंभीर आकडा, वाढणाऱ्या केसेस या सगळ्यांच्या मागे आणखी एक संख्या आहे ती म्हणजे ज्यांच्या चाचण्या सकारात्मक आल्या, पण त्यांनी या विषाणूविरुद्ध संघर्ष केला आणि जिंकून बाहेर आले. संडे एक्सप्रेसमध्ये (५ एप्रिल २०२०) त्यांच्या काही कथा सांगितल्या आहेत. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांसाठी त्या मराठीतून पोहचवत आहोत. प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला बऱ्या झालेल्या पेशंटचं नाव असून शेवटी माहिती घेतलेल्या पत्रकाराचं नाव आहे.

दिया नायडू – ‘आपण नेहमी विचार करतो, व्यवस्था आपला विश्वासघात करेल पण माझी जी काळजी घेतली गेली, त्यामुळे पुन्हा एकदा माझा विश्वास निर्माण झाला आहे’. दिया नायडू आठवड्याभरापूर्वी स्वित्झर्लंडवरून परत आल्या. सुरुवातीला वास आणि चव यांची जाणीवच होत नसल्याने त्यांना काहीतरी गोंधळ असल्याचे जाणवले. ‘मी ऑनलाईन कोविड-१९ ची लक्षणे तपासली. पण त्यावेळी फार केसेस सापडल्या नव्हत्या. माझ्या काही डॉक्टर मित्रांना कॉल केला असता, ते म्हणाले कदाचित सायनस असेल.’ त्यांनी सांगितले. ३६ वर्षीय नृत्यदिग्दर्शक दिया नायडू या स्वित्झर्लंडवरून एका कामाच्या टूरवरून ९ मार्च रोजी परतल्या. त्या स्वतःला वेगळं ठेवावे लागेल याबद्दल चिंताग्रस्त होत्या, पण तेव्हा स्वित्झर्लंडवरून आलेल्या लोकांना अलगावचा शिष्टाचार नव्हता. चीन, सिंगापूर, इराण, इटली इथून आलेल्या लोकांसाठी तो नियम होता. मदतीसाठी एक संपर्क केंद्र होते पण त्यावर कुणी उत्तर दिले नाही. त्यांच्यासोबतचे मित्र आणि सहकारी आपापल्या घरी जाऊन त्यांचे रोजचे आयुष्य जगत होते. त्या स्वतःहून खाजगी डॉक्टरांकडे गेल्या असत्या त्या संक्रमित देशातून न आल्याने त्यांची कोविड- १९ ची तपासणी होऊ शकणार नाही असे सांगण्यात आले. नंतर जेव्हा इतर देशातून आलेल्या लोकांची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यांना बोलावण्यात आले आणि त्यांची चाचणी सकारात्मक आली. अर्ध्या तासात एक डॉक्टर त्यांच्या घरी आले आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. त्यानंतर लगेच आपण कुणाकुणाला भेटलो? कुणा वृद्ध माणसाला तर भेटलो नाही ना? त्यांना आपण धोक्यात तर आणले नाही ना? अशी विचारणा करण्यात आली. नेहमीप्रमाणे त्या आपले आयुष्य जगत होत्या. डान्स स्टुडिओला जात होत्या. त्यांनी लगेच फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सावध केले. व्हाट्सअप वर एक ग्रुप केला. आपल्याला आता एकट्याला अलग (वेगळं) राहायचे आहे म्हटल्यावर त्यांनी सर्वप्रथम योगाला सुरुवात केली. त्या वेळेत हॉस्पिटलमध्ये अगदी ३० सेकंदासाठी जरी एखादी नर्स आली तरी त्या पेशंटना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत होत्या. तर लोक त्या स्वतःहून अलगावमध्ये गेल्या नाहीत म्हणून त्यांना ट्रोल करत होते. त्या दवाखान्यात असतानाही त्यांच्या घरमालकांनी त्यांना घर सोडण्यास सांगितले. अनेक अनोळखी लोकांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर त्यांना कोल्ड ब्ल्डेड मारेकरी म्हटलं आणि त्यांना अटक करण्यास सांगितलं. दुसरी चाचणी नकारात्मक आली पण त्यांच्यासमोर प्रश्न होता की दवाखान्यातून बाहेर पडल्यावर कुठे जायचे? जर लोकांनी या पेशंटचा तिरस्कार करणं बंद केलं नाही तर हे लोक समोर येणार नाहीत. ‘या सगळ्यामध्ये सरकारी कर्मचारी शांतपणे काम करत आहेत.’ म्हणूनच माझा आत्मविश्वास टिकून राहिला असे नायडू म्हणाल्या. ‘आपण नेहमी विचार करतो, व्यवस्था आपला विश्वासघात करेल पण माझी जी काळजी घेतली गेली, त्यामुळे पुन्हा एकदा माझा विश्वास निर्माण झाला आहे’. त्यांचे अलगाव मधील बऱ्यापैकी दिवस पोलीस अधिकाऱ्यांशी, महानगरपालिका आणि आणि सरकारी सुविधा केंद्रांशी फोनवर बोलण्यात गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला शोधण्यासाठी यंत्रणेने सर्वतोपरी काम केले. सुदैवाने त्यापैकी कुणाच्याच चाचण्या सकारत्मक आल्या नाहीत. त्यांना घरी परत येऊन पुन्हा आपले नृत्य आणि दैनंदिन जीवन सुरु करायचे आहे. पण ते आता कठीण दिसते आहे. त्यासाठी खूप धाडस लागणार आहे. त्या म्हणाल्या, ‘ डिस्चार्जनंतर एका मित्राने त्याचे कार्यालय अलगावसाठी देऊ केले आहे. त्यांना अजून १५ दिवस अलगावमध्ये राहावे लागेल. पण जोपर्यंत सगळ्या संक्रमित लोकांना माझ्यासारखी वागणूक मिळेल तोपर्यंत ही समस्या अशीच राहील आणि हे मी विषाणूबद्दल बोलत नाही.’ अमृता दत्त

मौलाना असद काझमी – सुदैवाने आयुष्यात इतर योजना होत्या मात्र आता कुटुंबासमवेत असण्याचा आनंद आहे. ‘मी दवाखान्यात असताना माझ्या मृत्यूच्या अफवा पसरत होत्या. मी जिवंत आहे का पाहण्यासाठी, मला लोकांचे कॉल येत होते. माझ्या कुटुंबातसुद्धा असे कॉल जात होते. हे खूप त्रासदायक होते.’ मुंबईच्या पूर्व भागातील एका मशिदीत उपदेशक असणारे ४३ वर्षीय मौलाना असद काझमी सांगतात. ३०० पेशंटच्या आकड्यानुसार महाराष्ट्र हे सर्वाधिक पेशंट असणारे राज्य आहे. आणि हळूहळू हा विषाणू मुंबईच्या झोपडपट्टीत शिरू पाहत आहे. जिथे सामाजिक अलगाव हे फार मोठे आव्हान सरकारसमोर असणार आहे. १७ मार्चला भारतात येण्यापूर्वी मौलाना श्रीलंका, बँकॉक, कंबोडिया आणि मलेशियाला जाऊन आले होते. २२ मार्च रोजी त्यांची चाचणी सकारात्मक आली आणि त्यांना चिंचपोकळीतील संसर्गजन्य रोगांसाठीच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ‘मी प्रवासाहून परत आल्यानंतर मला ताप आला. आणि तो काही दिवस कमीच आला नाही, म्हणून मी दवाखान्यात गेलो. माझे रिपोर्ट सकारात्मक आले, तेव्हा मला वाटलं, हा माझ्या आयुष्याचा शेवट आहे. एकदिवस बाथरूमपासून माझ्या बेडपर्यंत परत येत असताना मी चक्कर येऊनच पडलो. मला खूप भीती वाटत होती. मी पुन्हा माझ्या कुटुंबाला बघू शकेन की नाही असे विचार येत होते. त्यात मला डायबेटीसचा त्रास आहे. या सगळ्या ताणात माझी साखर वाढून मला काही झाले तर काय होईल असे अनेक विचार मनात येऊन गेले. पण जगण्याच्या माझ्याबद्दल आणखी काही योजना होत्या बहुतेक..’ हे सांगताना त्यांनाही भारावून आलं. ३० मार्च रोजी दोन चाचण्या नकारात्मक आल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र १४ दिवस अलगावमध्ये राहण्यास सांगितले. काझमी त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर १० बाय १५ च्या एका खोलीत राहतात. त्यांची बायको आणि चार मुले तळमजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर राहतात. ते वर्तमानपत्रातून इतर गोष्टी वाचत होते, पण त्यांना स्वतःला त्यांच्या शेजाऱ्यांकडून कोणताच त्रास न झाल्याचे त्यांनी सांगितले. कुणीच त्यांना विषाणू इथपर्यंत आणल्याचा दोष दिला नाही. उलट ते घरी आल्यावर लोक त्यांची विचारपूस करण्यास येत होते मात्र त्यांनी त्यांना येऊ दिले नाही. बरं झाल्यानंतर पहिल्यांदा मस्जिदमध्ये जाऊन अल्लाहचे आभार मानणार असल्याचे ते सांगतात. मी उपदेशक असल्यानेच लोक मला एवढा सन्मान देतात. म्हणून मिळालेला वेळ ते कुराण शरीफ आणि मोहम्मद पैगंबर यांच्या आयुष्यावरील पुस्तक वाचण्यात घालवीत आहेत. – लक्ष्मण सिंग

शाम्बली – मी कोविड -१९ ची रुग्ण होते हे कोणालाच कळणार नाही. फोनवरील अँग्री बर्डचा गेम आणि चेतन भगतचे ‘द गर्ल इन रूम १०५’ हे शाम्बलीचे दवाखान्यातले आणि सध्या घरातले सोबती आहेत. नोएडामधल्या आपल्या अपार्टमेंटच्या खोलीमधून एमबीबीएसची विद्यार्थिनी असलेली २२ वर्षाची शाम्बली सांगते, ‘मला सूर्योदय कधी होतो आणि तो अस्ताला कधी जातो हेही समजत नाही. १४ मार्च ला Tbilisi State Medical University in Georgia इथून ती आपल्या घरी दिल्लीला परत आली. तिचे पालक झारखंडमध्ये राहतात. ती दिल्लीच्या तिच्या अपार्टमेंटमधील घरी आली. तिला डोकेदुखी, खोकला आणि सर्दी जाणवू लागली. लगेच तिने ओला कॅब बुक केली आणि गव्हर्नमेंट इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स, नोएडा इथे गेली. इथे तपासणी केल्यानंतर तिची चाचणी सकारात्मक आली. सुरुवातीच्या ३-४ दिवसात तिला तिच्यावर सुरु असणाऱ्या औषधांचे काही साईड इफेक्ट जाणवू लागले. ‘मला उलटी होत होती, श्वास घ्यायला त्रास होत होता, पण प्रामाणिकपणे सांगते मला कधीच वाटले नाही मी मरणार आहे. एरवी ताप येतो तसेच वाटत होते. मला कुणाचीच तक्रार करायची नाही. कारण सगळेच घाबरले होते. डॉक्टर आणि नर्सेसना घरी संसर्ग जाण्याची भीती होती असं शाम्बली म्हणत होती. तिचे आईवडील तिला अलगावमध्ये ठेवावे लागेल म्हणून नोएडाला आले. तिच्या अपार्टमेंटमधील लोकांकडून तिने काळजी न घेतल्याबद्दल त्यांना खूप ऐकून घ्यावे लागले. ते अतिप्रमाणात प्रतिसाद देत होते पण, मी माझी काळजी घेतली होती आणि कुणाच्याही संपर्कात आले नव्हते. असंही शाम्बली म्हणाली. तिने तिच्या वडिलांना याकडे दुर्लक्ष करून केवळ चीफ मेडिकल ऑफिसरचे ऐकायला सांगितले. २६ मार्चला ती परत आल्यावर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशननी काही प्रश्न उपस्थित केले. पण ती स्वतःच्या घरी राहायला आल्यामुळे फार त्रास झाला नाही. ती आता १४ दिवसांच्या अलगावमध्ये आहे. तिचे आईवडील तिला केवळ जेवण देतात. ती इतर कुणाच्याही संपर्कात येत नाही तिच्या खोलीत बसून गेम खेळत असते किंवा पुस्तक वाचते. काही ऑर्डर केल्यास तिचे बाबा गेटवरून घेऊन येतात. तिला तिच्या कॉलेजला हे कळविणे गरजेचे वाटत नाही, कारण आता ऑनलाईन क्लासेस सुरु होणार आहेत. कॉलेज तसेही बंद आहे. ती म्हणते, या साथीच्या आजारात मला माझे वर्ष वाया घालवायचे नाही आणि काही दिवसांनी मी गॅलरीत आले तर हे लोक सुद्धा मला ओळखणार नाहीत की ही हीच मुलगी आहे जिला कोरोना झाला होता. – अंकिता द्विवेदी जोहरी

रिटा बचकानीवाला – मला माझ्या आयुष्याची किंमत आहे. आता तर खूपच जास्त आहे. हा माझा पुनर्जन्म आहे. जेवणाच्या टेबलजवळच्या चार खुर्च्या एकमेकांपासून फूटभर लांब ठेवल्या जातात, कारण व्यवस्थित अंतर ठेवता यावे. २९ मार्चला सुरतच्या न्यू सिव्हिल हॉस्पिटलमधून रिटा घरी आल्यापासून त्यांच्या घरामध्ये सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. त्या १९ मार्च रोजी लंडनहुन सुरतला परत आल्या. त्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची पदवी ब्रुनेल विद्यापीठातून घेत आहेत. ‘माझे विद्यापीठ बंद झाल्यावर मी घरीच थांबत होते. कदाचित हीथ्रो किंवा मुंबई विमानतळावर मला संसर्ग झाला असेल.’ असे त्या फोनवरून सांगत होत्या. २१ वर्षाच्या रीटाला परत आल्यावर खोकला आणि ताप आला. ती सांगते “माझी चाचणी सकरात्मक आली तेव्हा मला धक्का बसला नाही कारण मी मनाची तयारी करू ठेवली होती.” तिचे आई वडील आणि भाऊ यांनीसुद्धा सुरत मधील कॉटर्स मध्ये स्वतःला अलगाव मध्ये ठेवून घेतले. पण त्यांच्या चाचण्या नकारात्मक आल्या. “मला तोंडाने खायची औषधे आणि इंजेक्शन सुरु होती, IV द्रव सुरु होते. दवाखान्यातील स्टाफ मला दिवसातून ५ वेळा बघायला येत होता. ते माझ्या शरीराचे तापमान, माझा रक्तदाब आणि श्वास तपासत होते. सगळ्यात वेदनादायी भाग म्हणजे ते माझ्या नाकातून नमुने घेत होते. रिटा सांगते. दवाखान्यातून परत आल्यावर तिने एक व्हिडीओ केला आणि एनसीएच, सर्व डॉक्टर्स यांचे आभार मानत लोकांना सरकारी दवाखान्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले. दवाखान्यात असताना केवळ एकदाच आणि तेही एका काचेच्या पलीकडे मला माझ्या आई-वडिलाना बघता आले. तिथे टीव्ही नव्हता किंवा इंटरनेटही नव्हते. मी ३ कादंबऱ्या वाचून पूर्ण केल्या. सोबत अर्थशास्त्राचे पुस्तक नेले होते, अभ्यास केला. घरच्यांशी फोनवर बोलत होते. अगदीच कंटाळा आला तर फोनवर गेम खेळत होते. मी दवाखान्यातून बाहेर पडल्यावर महानगरपालिकेच्या एका घरी राहायला गेले तिथे जवळच माझे आईवडील होते. आम्हा सगळ्याचा अलगाव संपल्यावर आम्ही घरी गेलो. मी सगळ्यात पहिल्यांदा आमचे अध्यात्मिक गुरु स्वामी निजानंद यांच्या फोटोसमोर नतमस्तक झाले. माझ्या आईला मुख्यमंत्री विजय रुपांनी यांचा फोन आला. त्यांनी आमची तब्येत विचारून दवाखान्यात सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले. या सगळ्या दिवसांमध्ये मी मला माझ्या आयुष्याची, घरच्यांशी, मित्रांशी असणाऱ्या नात्याची किंमत कळाली. हा माझा पुर्नजन्मच आहे. – कमल सय्यद

६८ वर्षीय महिला – मी जिवंत असल्याचा आनंद आहे पण घरी परत आल्यानंतरच्या भेदभावाची भीती वाटते आहे. ‘मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात वडिलांना सर्दी आणि खोकला झाला. तो साधारण आजाराप्रमाणे भासत होता. एकदिवस आशा दीदी आल्या आणि घरी कुणी आजारी आहे का? विचारले. वडील आजारी आहेत म्हटल्यावर त्या त्यांना घेऊन गेल्या. आणि त्यांची चाचणी सकारात्मक आली.’ त्यांचा ३६ वर्षीय मुलगा सांगत होता. त्यानंतर त्यांच्या घरातील इतर १४ लोकांना रायपूरच्या सरकारी अलगाव केंद्रात नेण्यात आले. ही राज्यातील ३ री केस होती. पण ही केस इतरांपेक्षा वेगळी होती. कारण रुग्णाचा परदेश प्रवासाचा काही इतिहास नव्हता. त्यांच्या कुटुंबातील दोन मुले आणि नातवांसोबत सगळ्यांच्या चाचण्या नकारात्मक आल्या. त्यांना रायपूरच्या एम्समध्ये नेण्यात आले. १० दिवसांच्या उपचारानंतर ६८ वर्षाच्या व्यक्तीला दवाखान्यातून सोडण्यात आले. आणि त्यांच्या कुटुंबाला ठेवण्यात आले होते तिथे पुढच्या १५ दिवसांच्या अलगावसाठी ठेवण्यात आले. संपूर्ण कुटुंब चार खोल्यांमध्ये आहे. जिथे मुले बराचसा वेळ मोबाईलवर गेम खेळण्यात घालवतात. यंत्रणेने काही पुस्तके आणून दिली आहेत. ते म्हणतात कधी बाहेर फेरफटका मारायला जातोय असं झालय. आपण बऱ्याचदा लोकांना चार भिंतीत राहायला सांगतो पण ते सुद्धा कंटाळवाणे होऊन जाते. ‘मी जिवंत असल्याचा आनंद असला तरी इथून परत गेल्यानंतर लोकांकडून मिळणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीची भीती या पेशंटला वाटत आहे. माझ्या एकट्यामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाला सहन करावे लागेल. लोक आम्हाला अस्पृश्यासारखी वागणूक देतील.’ या कुटुंबाला संचारबंदीमुळे त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय ठप्प असल्याचीही चिंता आहे. पण सुदैवाने त्यांचे स्वतःचे घर असल्याने त्यांना डोक्याखाली छप्पर आहे आणि दोन टेम्पो असल्याने इतर थोडी मदतही आहे. त्यांचा ३८ वर्षाचा दुसरा मुलगा म्हणतो,’ आम्हांला आश्चर्य वाटते आहे, बाबांना हा आजार कसा झाला? पण ते बरे झालेत याचा आनंदही खूप मोठा आहे.’ – गार्गी वर्मा

३७ वर्षीय महिला – घरी ६ महिन्याचे बाळ आहे, मला खात्री नाही मला कामावर परत जायचे आहे का? – तीन आठवड्यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधील एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जी कोविड -१९ च्या रुग्णाचा प्रवास अर्ज भरू घेत होती. त्यांच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेत होती. २० मार्च रोजी ती स्वतःच सकारात्मक केसेसच्या यादीमध्ये सामील झाली. हे एक असं युद्ध होतं जिथे शारीरिकपेक्षा मानसिक लढाई जास्त होती. ‘घसा खवखवत होता आणि जुलाब झाले म्हणून मी तपासणी केली, २० मार्च रोजी माझी चाचणी सकारात्मक आली. दुसऱ्या दिवशी माझ्या बाळाची आणि नवऱ्याची चाचणी घेण्यात आली. आणि मला अलगावसाठी Medanta इथे ठेवण्यात आले. १० दिवस अलगावमध्ये आणि तेही एका ६ महिन्याच्या बाळाच्या आईला – हे खूपच कठीण होतं. मी माझ्या बाळापासून खूप दूर होते. केवळ माझ्या कुटुंबाशी दररोज संपर्कात असल्याचा एक आधार होता. माझ्या विभागाकडून मिळालेल्या सहकार्यामुळेही मला ताकद मिळाली.’ मेडिसिटी येथील ६ महिन्याच्या बाळाची आई २ एप्रिल रोजी तिच्या कुटुंबाला भेटल्यावर संडे टाइम्सशी बोलताना सांगत होती. जरी तिच्या मुलाचे आणि नवऱ्याचे अहवाल नकारात्मक आले असले तरी त्यांची दुसरी लढाई वेगळीच होती. तिचे काही शेजारी त्यांना कुठेतरी दुसरीकडे जाण्यास सांगत होते. त्यापैकी काहींनी तिच्या नवऱ्याचा आणि तिचा अक्षरशः छळ केला. शेवटी त्यांनी पीसीआरला त्यांच्या शेजाऱ्यांचे समुपदेशन करायला बोलावले. पण या सगळ्यात काही चांगले शेजारीही होते जे तिच्या नवऱ्याला जेवण आणून देत होते आणि सर्व प्रकारची मदत करत होते. त्यांच्या नवऱ्याने स्वतःला अलगावमध्ये ठेवले होते. काही गरजेची वस्तू आणायची असल्यास ते आणून देत होते असेही तिने सांगितले. उपचार घेत असताना तिला तिच्या घरच्यांशी व्हिडीओ कॉलवर बोलता येत होते. टीव्ही बघता येत होता आणि बातम्याही वाचता येत होत्या. १० दिवसांनी १ एप्रिल रोजी त्यांचे दोन नमुने नकारात्मक आल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. त्या म्हणाल्या ‘मला आता माझ्या बाळाकडे आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचे आहे. मला लगेच कामावर जाता येईल की नाही याची खात्री नाही. अजून मला थोडी मळमळ होतंच आहे. मला माहित नाही मला माझी टीम परत जॉईन करता येईल की नाही.’ – साक्षी दयाळ

कोरोनाशी लढा चालू असताना या आजारातून बाहेर पडलेल्या लोकांना, सोबतच आजाराची भीती बाळगलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर रहायला मदत करणं फार गरजेचं आहे. एक सुजाण आणि संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून तुम्ही हे समजून घ्याल ही आशा नक्कीच आहे.

जयश्री देसाई यांनी या संवादाचा अनुवाद केला आहे. जयश्री या मुक्त पत्रकार असून त्यांना वाचन, लेखन, वक्तृत्व, शब्दांकन आणि प्रवासाची आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 9146041816

Leave a Comment