कृष्णा हॉस्पिटलमध्ये पेसमेकरची रोपण प्रक्रिया यशस्वी;पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच उपचार पद्धतीचा अवलंब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात अद्ययावत पेसमेकरची यशस्वी रोपण प्रक्रिया नुकतीच पार पडली. अतिशय गुंतागुंतीची समजली जाणारी ही रोपण प्रक्रिया पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली असून, हृदयविकारग्रस्त रूग्णांसाठी ही उपचार प्रणाली वरदान ठरणार आहे.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी हृदयाची कार्यक्षमता कमी होणे आणि ठोके कमी पडणे या कारणाने एक रूग्ण दाखल झाला होता. या रूग्णाची तपासणी केल्यानंतर त्या रूग्णावर सीआरटी या महागड्या पद्धतीद्वारे उपचार करण्यावाचून पर्याय नव्हता. दरम्यान, या रूग्णाची तपासणी करणारे डॉ. राहुल पाटील यांनी कृष्णा हॉस्पिटलचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांच्याशी सल्लामसलत केले असता, डॉ. शेळके यांनी रूग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून सीआरटी या महागड्या उपचारपद्धतीऐवजी नवीन पद्धतीने अद्ययावत पेसमेकर बसविण्याचे ठरविले. त्यानुसार बंडल ऑफ हीस पेसिंग म्हणजेच अद्ययावत पेसमेकरची रोपण प्रकिया यशस्वीपणे करण्यात आली.

या प्रक्रियेमध्ये ईपी सिस्टिमच्या सहाय्याने प्रथम हृदयाचा नैसर्गिक विद्युतप्रवाह मार्ग शोधला जातो आणि त्यानंतर तिथे पेसमेकर वायरचे लीड रोपण केले जाते. ज्यामुळे नैसर्गिक विद्युत प्रवाह मार्ग प्रवाहित होतो आणि हृदयाचे ठोके सामान्य होतात.

हृदयाचा अनुवांशिक आजार असलेला आणखी एक रूग्णदेखील कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात दाखल झाला होता. अनुवांशिक आजारामध्ये हृदयाचे खालचे कप्पे आणि रक्तवाहिनी यांची अदलाबदल झालेली असल्याने अशा रूग्णांवर उपचार करणे अत्यंत गुंतागुंतीचे व जोखमीचे असते. मात्र अशा रूग्णावरही अद्ययावत पेसमेकरची यशस्वी रोपण प्रक्रिया करून या रूग्णाच्या हृदयाचे ठोके सामान्य करण्यात डॉ. शेळके यांना यश मिळाले.कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणखी एका रूग्णावरही ही प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.

याबाबत माहिती देताना डॉ. अभिजीत शेळके यांनी संगितले, की कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असा हृदयरोग उपचार विभाग कार्यरत असून, या विभागात अनेकदा अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. अद्ययावत पेसमेकर बसविण्याच्या उपचार पद्धतीचा पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच वापर करण्यात आला असून, यासाठी इको विभागातील डॉ. रमेश कवडे यांच्यासह ऑपरेशन विभागातील तज्ज्ञ स्टाफ व नर्सिंग स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले. अद्ययावत पेसमेकर उपचार पद्धतीमुळे हे तिन्ही रूग्ण आपले आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगत असून, गरजू रूग्णांसाठी ही उपचार प्रणाली वरदान ठरणार आहे. त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार असणार्‍या रूग्णांनी कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. शेळके यांनी केले आहे.

Leave a Comment