Friday, June 2, 2023

‘इथे माणसे राहतात, याचे भान ठेवा’; प्रशासकांची अधिकाऱ्यांना तंबी

औरंगाबाद – शहरात जागोजाग कचरा पडून असल्याने प्रशासक आस्तिककुमार पांडेय बुधवारी संतप्त झाले. इथे माणसे राहतात, याचे भान ठेवा, अशा शब्दात अधिकाऱ्यांना तंबी देत कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या रेड्डी कंपनीला 10 हजार रुपये दंड लावण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासकांनी दिले.

प्रशासक पांडेय यांनी सिडको, रेल्वेस्टेशन, शहानुर मियॉं दर्गा रोड, कालिकामाता मंदिर, बाळकृष्ण नगर, कारगिल उद्यान, विजयनगर भागांची पाहणी केली. दर्गा परिसरात कृषी विभागाच्या कार्यालयाच्या रस्त्याच्या कडेला कचरा आढळून आला. हा कचरा तातडीने उचलण्याचे आदेश पांडेय यांनी स्वच्छता निरीक्षकास दिले. यानंतर विजयनगर भागात कालिकामाता मंदिराच्या बाजूला कचरा आढळून आला. नागरिकांनी तेथे कचरा टाकल्याचे प्रशासकांच्या निदर्शनात आले. साचलेला कचरा पाहून संतप्त पांडेय यांनी संबंधितांना जाब विचारला. ‘इथे माणसं राहतात, याची जाणीव तुम्हांला असली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. रेड्डी कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड व स्वच्छता निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.

यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, वॉर्ड अधिकारी ज्ञाते, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव उपस्थित होते. दरम्यान प्रशासकांनी रेल्वेस्टेशन समोरील पेट्रोल पंपाच्या जागेची पाहणी केली. याठिकाणी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याची सीमा व्यवस्थित करण्याची सूचना प्रशासकांनी अधिकाऱ्यांना केली. परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची प्रशासकांनी पाहणी केली असता ते नियमानुसार सुरू नसल्याने संबंधिताला दंड लावण्याचे आदेश त्यांनी दिले. इमारत निरीक्षक कुठे आहे? असा जाब त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्याला विचारला. पण त्यांना उत्तर देता आले नाही. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत? अशी तंबी त्यांनी दिली.