औरंगाबाद प्रतिनिधी । सागर सीताराम ढगे (वय३०) याचा पहिल्या पत्नीपासून सुमारे दीड वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्याचे पहाडसिंगपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत काही महिन्यांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. ती महिला देखील पतीपासून विभक्तच राहत होती. दोघांनी नवीन संसार थाटण्याचा निर्णय घेत इटखेड येथे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. आठवडाभरापूर्वी दोघेही इटखेड येथे राहायला गेले होते मात्र शुक्रवारी दुपारी सागरने राहत्या घरी स्कार्फने गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागरवर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार होते मात्र सागरच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यात नकार देत प्रेतही ताब्यात घेण्यास इन्कार केला. नातेवाईकांच्या मतानुसार ही आत्महत्या नसून खून आहे. जोपर्यंत त्या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने घाटी रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. पोलीसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असून संबंधित महिलेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.