राज्यात पेट्रोल-डिझेल महागले; इतकी झाली इंधन दर वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (VAT) अधिभार वाढ केली आहे. त्यामुळं सोमवारपासून पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर २ रुपये महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रती लीटर ७८.३२ रुपये झाला असून डिझेल दर ६८.२१ रुपये आहे. याआधी मार्च महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर १ रुपया अतिरिक्त अधिभार लावला होता.

कोरोना रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदीचा पाचवा टप्पा सुरु आहे. मात्र इंधन विक्री कमी झाल्याने सरकारचा कर महसूल आटला आहे. कर उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. दरम्यान, राज्यात इंधनावर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करावरील (VAT) अधिभारात वाढ केल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किमान २ रुपयाने वाढवल्याने सरकारच्या तिजोरीला महिन्याला किमान ५०० कोटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त होण्याचा अंदाज आहे. याआधी केंद्र सरकारने पेट्रोवरील उत्पादन शुल्क १० रुपये आणि डिझेलवरील शुल्क १३ रुपये प्रती लीटर वाढवले होते.

व्हॅटवरील अधिभाराने राज्यात पेट्रोल आणि डिझेल महागले असले तरी देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे भाव स्थिर आहेत. इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार सोमवारी मुंबई वगळता इतर प्रमुख शहरांत इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ७१.२६ रुपये आहे. डिझेलच्या दरात देखील कोणताही बदल झालेला नाही. डिझेलचा भाव ६९.३९ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोल दर ७५.५४ रुपये असून डिझेल ६८.२२ रुपये आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल दर प्रती लीटर ७३.३० रुपये असून डिझेल ६५.६२ रुपये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”