होळीदिवशी सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता!! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, पहा आजचे दर

Petrol-diesel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज होळी सणाच्या (Holi Festival) मुहूर्तावरच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. देशभरातील महागाईच्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा निर्देशांक 4 टक्के खाली आला आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol And Diesel) दर स्वस्त झाले आहेत. खास म्हणजे, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्ता या महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दरवाढ झाली आहे.

मुंबईकरांना इंधन दरात मोठी कपात

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत इंधन दर कमी झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) नव्या आकडेवारीनुसार, मुंबईत पेट्रोलच्या दरात 44 पैशांनी घट होऊन प्रति लिटर 103.50 रुपये झाला आहे. तर डिझेलच्या दरात तब्बल 2.12 रुपयांची कपात झाल्याने नवीन दर 90.03 रुपये प्रति लिटर झाला आहे.

दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्तामध्ये इंधन दरवाढ

मुंबई वगळता इतर महानगरांमध्ये इंधन दरवाढ झाली आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी 5 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. चेन्नईत पेट्रोल 100.80 रुपये तर डिझेल 92.39 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

त्याचबरोबर, कोलकत्ता येथे इंधन दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. येथे पेट्रोलच्या किमतीत 1.07 रुपयांची वाढ होऊन तो 105.01 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलच्या किमतीत 1.06 रुपयांची वाढ होऊन तो 91.82 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ घट झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आखाती देशांमध्ये ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत 0.14 टक्क्यांची घसरण झाली असून, त्याची किंमत 70.85 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 14% घसरण झाली आहे. अमेरिकन क्रूड तेलाच्या किमतीत देखील किंचित घट झाली आहे.

दरम्यान, सध्याच्या महागाईच्या काळात इंधन दरातील चढ-उतार नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत. मुंबईत इंधन दर घसरल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असला, तरी इतर भागातील वाढीव दर नागरिकांच्या खिशाला फटका देणारे ठरू शकतात. महत्त्वाचे म्हणजे गेल्या एक दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील महागाईचा आलेख जाहीर केला होता. ज्यात महागाई कमी झाल्याचे म्हटले होते. अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे नागरिकांची महागाईपासून सुटका होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.