मुंबई । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरवाढीचा सपाटा लावला आहे. अनलॉकनंतर इंधन मागणीत वाढ झाली आहे. कठोर लॉकडाऊनमधील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी दरवाढीचा मार्ग स्वीकारला आहे. आज शुक्रवारी पेट्रोल ११ पैशांनी महागले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोल ८८.५८ रुपये झाले आहे.
शुक्रवारच्या इंधन दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.५८ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८०.११ रुपयांवर स्थिर आहे. याआधी गुरुवारी पेट्रोल १० पैशांनी महागले होते. तर बुधवारी पेट्रोल दरवाढीला ब्रेक लागला होता, मात्र सलग २ दिवस पुन्हा कंपन्यांनी पेट्रोल दरात वाढ केली. इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार मागील १३ दिवसांमध्ये २ दिवस पेट्रोलचा भाव स्थिर होता. तर उर्वरित ११ दिवसांत पेट्रोल १.५१ रुपयांनी महागले आहे.
मुंबईव्यतिरिक्त देशातील अन्य महानगरात सध्या इंधन महागले आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.९४ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.९१ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८३.४३ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लीटर आहे. .
जागतिक बाजारात मागील महिनाभर कच्च्या तेलाचा भाव स्थिर आहे. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने तेल आयातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी मागील सहा दिवस पेट्रोल दरात वाढ केली होती. तर जवळपास ३ आठवडे डिझेलची किंमत स्थिर आहे. दरम्यान, गुरुवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५ सेंट्सने घसरला आणि प्रती बॅरल ४३.३४ डॉलर झाला. बुधवारी तेलाच्या किमतीत ४ सेंट्सची वाढ झाली होती. ब्रेंट क्रूडचा भाव ४५.६६ डॉलर प्रती बॅरल झाला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”