सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
संजयनगर परिसरात असणार्या एस्सार पेट्रोल पंपवर दहा लाखांची खंडणी देण्यासाठी चौघा तरुणांनी तुफान राडा केला. पेट्रोलपंप चालकास बेदम मारहाण करत एका तरुणाला चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सदरची घटना हि गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी सर्वेश अमोल भोई याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्याच्या फिर्यादीवरून हल्ला करणार्या अज्जू इनामदार यांच्यासह तिघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वेश भोई याचे काका शरद भोई यांच्या मालकीचा कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर जवळ एस्सार कंपनीचा पेट्रेल पंप आहे. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संशयित चौघेजण पेट्रोल पंपवर येऊन १० लाख रुपये खंडणी देण्यासाठी शरद भोई आणि इंद्रजित भोई यांच्याशी वाद घालू लागले.
पैसे देण्यास भोई यांनी नकार दिल्यानंतर चौघांनी मिळून इंद्रजित भोई आणि शरद भोई यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी सर्वेश भोई याने वाचविण्याचा प्रयत्न केला असता अज्जू इनामदार याने त्याच्या जवळ असणार्या चाकूने सर्वेश याला भोसकले. त्यानंतर चौघांनी पेट्रोल पंपावर दगडफेक करत पलायन केले.या प्रकरणी सर्वेश भोई याने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.