सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
फलटण येथील एका युवकाची कोरोना चाचणी पोझिटिव्ह आली असून तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमोद गडीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या ३६ वर गेली आहे. सदर युवक चार दिवसांपूर्वी पुण्याहून फलटणला आला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्वागचे नमुने पुनबे येथे तपासणी करता पाठवण्यात आले होते. आज पुणे येथीप बी.जे. मेडिकल काॅलेज कडून त्याचा अहवाल प्राप्त झापा असून तो कोरोना पोझिटिव्ह असल्याचे कळवण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदरचा कोरोना पॉझिटिव्ह तरुण शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी पुण्यावरुन फलटण येथे आला होता. सदर २८ वर्षीय तरुणाला ताप व खोकला येत असल्याने तो घरी न जाता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी त्याचा स्वॅब घेऊन BJMC ला तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. सोमवार दिनांक २७ एप्रिल रोजीच्या अहवालामध्ये सदर व्यक्तीची चाचणी कोविड१९ साठी पाॅझिटिव्ह आली आहे. सदर तरुण तब्बल १७ जणांच्या संपर्कात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. सदर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला पुढील उपचारासाठी सिव्हील हाॅस्पीटल, सातारा येथे पाठविण्यात आले आहे. बाधित व्यक्ती फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय वगळता इतर कोणत्याही नागरिकांच्या संपर्क न आल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
दरम्यान, सातारा जिल्हा आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनत आहे. कराड आणि जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. कराड, पाटण, जावळी येथीप काोरोना प्रभावीत काही गावे पुर्णपणे सील करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आता फलटण वासीयांनाही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. कोविड-१९ विषयी पूर्वी दिलेल्या मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार साबणाने हात धुणे इ. सारख्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असून बाहेरगावावरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनास देणे आवश्यक आहे. याशिवाय स्थानिक व बाहेरगावावरुन आलेल्या आणि खोकला, ताप इ. लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेणे आवश्यक आहे असे आव्हान उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.




