तब्बल दीड तास कुठलीच मदत उपलब्ध नाही ; ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाणी वाया
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील वडारवाडी परिसरात पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला वारंवार सूचना करुनही पालिकेने पुढाकार न घेतल्याने पाईपलाईन आणखी फुटली. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रसंग घडला असून सव्वाचार वाजेपर्यंत महापालिकेकडून कुठलीही मदत न आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
वडारवाडीच्या दोन्ही बाजूस – फर्ग्युसन कॉलेज रोड व गोखले रोड, पाणी झाल्याने भीतीयुक्त रंगपंचमीचा अनुभव स्थानिकांना घ्यावा लागला. अनेक ठिकाणी चेंबर्स उघडे असल्याने लहान मुले त्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक ४ नगरसेवकांना वारंवार सूचना देऊनही लक्ष न दिल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.
या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पुणे शहरात पाणी वितरण व्यवस्था नादुरुस्त असल्याने घडलेली गेल्या ६ महिन्यातील ही दुसरी घटना असून जनता वसाहत प्रकरणातुन महापालिकेने काय धडा घेतला असा सवालही उपस्थित होत आहे. पाईपलाईन फुटून सव्वा तास उलटून सुद्धा स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे या भागातील सागर धोतरे विकी टिळेकर ईशवर बनपटे रवी कुसळकर अशा काही तरुणांनी स्थानिकांना मदत करण्यास सुरुवात केली. काही महिन्यापूर्वी दांडेकर पुलावर असाच प्रसंग घडला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनेतून पालिका प्रशासन लक्ष घालणार आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होतोय.