धक्कादायक! पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ११० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा; १८ जणांना अटक

चेन्नई । तामिळनाडूच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याचा खुलासा तामिळनाडू सरकारने केला आहे. या योजनेत एकूण ११० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे. या योजनेसाठी पात्र नसलेले लोक या योजनेचा लाभ घेत होते, असे तामिळनाडू सरकारने स्पष्ट केलं आहे. या घोटाळ्याअंतर्गत ११० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. या प्रकरणी एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्य सचिव गगनदीपसिंह बेदी यांनी या घोटाळ्याची माहिती दिली. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अचानक प्रमाणापेक्षा अधिक वाढली असल्याचे ऑगस्टमध्ये लक्षात आले असे बेदी म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा तामिळनाडूतील एकूण १३ जिल्ह्यांमध्ये झाला आहे. यात कल्लाकुरीची, विल्लुपुरम, कुडलूर, तिरुवन्नमलाई, वेल्लोर, राणीपेट, सालेम, धर्मपुरी, कृष्णागिरी आणि चेंगलपेट या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या प्रकरणात कारवाई करण्यात आली असून, त्या अंतर्गत एकूण १८ दलालांना अटक करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कृषी योजनेशी संबंधित ८० अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर ३४ अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती बेदी यांनी दिली. या घोटाळ्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठा हात असल्याचे स्पष्ट होत आहे.

या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज मंजुरी प्रणालीचा वापर करून अनेक लोकांना ते लाभार्थी नसताना त्यांना लाभार्थी बनवले होते. या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना या योजनेत जोडण्यासाठी दलालांना लॉग इन आणि पासवर्ड पुरवले होते. यात अधिकारी दलालांना प्रत्येकी २ हजार रुपये देखील मिळत होते. दरम्यान, सरकारने आतापर्यंत एकूण ३२ कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती मिळत आहे. येत्या काही दिवसात उर्वरित वसूल केली जाईल असे तामिळनाडू सरकारने म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like