हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले. दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी योजना ‘मिशन 500’ आहे . या कराराद्वारे भारत आणि अमेरिकेचे उद्दिष्ट 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचे ठरवले आहे. म्हणजेच पुढील काही काळात भारताला याचा मोठा फायदा होणार आहे.
10 वर्षांसाठी संरक्षण भागीदारीवर स्वाक्षरी –
व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान F-35 लढाऊ विमानांची विक्रीसह, पुढील 10 वर्षांसाठी संरक्षण भागीदारीवर स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी आपल्या देशांमधील व्यापार वाढविण्यासाठी आपसात सहकार्य करण्याचा निर्धार केला आहे. ट्रम्प यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, भारताला लष्करी विक्रीचे मूल्य अनेक अब्ज डॉलर्सने वाढविले जाईल.
द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य –
‘मिशन 500’ अंतर्गत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी दोन्ही सरकारांनी न्याय आणि सुरक्षा सुनिश्चित करणारी, तसेच रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणारी धोरणे आणण्याची योजना आखली आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी आपले नागरिक अधिक समृद्ध आणि देश अधिक मजबूत बनविण्याच्या दृष्टीने व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याचे वचन दिले.
‘मिशन 500’ भारतासाठी फायदेशीर योजना ठरणार –
भारत-अमेरिका मिशन 500 चे उद्दिष्ट गाठण्यासाठी नव्या व्यापार अटी आणि बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराची वाटाघाटी 2025 पर्यंत सुरू होईल. यामध्ये तंत्रज्ञान, व्यापार, आणि संरक्षण क्षेत्रातील सहकाराची गती वाढविणे, तसेच व्यापाराचे स्वरूप अधिक फायदेशीर बनविणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच ‘कॉम्पॅक्ट’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली. ‘मिशन 500’ भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आणि फायदेशीर योजना ठरणार आहे, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.