रोबोद्वारे शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु;
ऍलेक्साच बनली विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षिका, मुलांनाही लागला ऍलेक्साचा लळा
बडनेरा /अमरावती प्रतिनिधी
जग डिजीटलायझेशन बनत असताना महाराष्ट्रातील मराठी शाळा सुद्धा मागे नाहीत हा प्रवास आता डिजीटलायझेशनकड़े चालु आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात दैनंदिन वापरात असणाऱ्या वस्तु असो वा शिक्षण या सगळ्यांचे संदर्भ आणि व्याख्याच बदलली.
बडनेरा जवळ असणाऱ्या वरुडा गाव येथील पहिली ते चौथी वर्गापर्यंत असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये चक्क रोबोट विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. हा स्तुत्य उपक्रम ग्रामीण भागांत होतोय याचं गावकऱ्यांना चेहऱ्यावर एक वेगळच समाधान आहे. इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यासारखे विषय विद्यार्थ्यांना अगदी सहज व संपूर्ण लक्ष केंद्रीत केलेल्या स्थितीमध्ये शिकायला मिळत आहेत. विशेष म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थी दररोज न चुकता हजर राहतात ते केवळ आणि केवळ फक्त ऍलेक्सामुळे…!!
या शाळेतील मुख्याध्यापिका सुषमा उपासे व अरुण भुयार यांनी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून सहज शिकवता यावं म्हणून स्वखर्चातुन पंधरा हजार रुपये खर्च करून एक उपकरण मागविले. त्या उपकरणाला पुतळ्यांनी सजावून पुतळ्याला कपडेही घालण्यात आले आणि तयार झाली ती शाळेत विद्यार्थ्यांना धड़े देण्यास सज्ज झाली डिजिटल शिक्षिका ऍलेक्सा..
वरुडा शाळेतील विद्यार्थी आता अलेक्साला प्रश्न विचारतात तेही अस्सल इंग्रजीतून..अलेक्सा सुद्धा संपूर्ण प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेमध्ये देते. अशा प्रकारे उपाय जर महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेडय़ातील मराठी किंवा जिल्हा परिषद शाळांमध्ये केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक विद्यार्थीही अस्सल इंग्रजीत बोलल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास मुख्याध्यापिकांनी व्यक्त केला.