Tuesday, January 31, 2023

मोदी सरकारचे २० लाखांचे पॅकेज म्हणजे देशवासियांची क्रूर चेष्टा- सोनिया गांधी

- Advertisement -

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सगळ्या विरोधी पक्षांसोबत आज बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची देशवासियांची चेष्टा आहे. देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केलं आहे. लोक शेकडो किमी पायी चालत आहेत. या स्थलांतरित कामगारांसाठी सरकारने काहीही केलं नाही, असं सोनिया गांधी या बैठकीत म्हणाल्या.

कामगारांना त्यांच्या घरी जाऊ द्या. सगळ्यांच्या खात्यावर थेट पैसे ट्रान्सफर करणं गरजेचं आहे, पण सरकारने ते केलं नाही, असा आरोप सोनिया गांधींनी केला आहे. तसंच अशा प्रकारचं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सल्लामसलत आपल्या विरोधी पक्षांसोबत केली पाहिजे असं या केंद्र सरकारला वाटलं नाही. यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंत्रालयांच्या शक्ती आपल्याकडे घेतल्याची टीकाही सोनिया गांधींनी यावेळी केली आहे.

- Advertisement -

काही भाजपशासित राज्यात कामगार कायद्यात बदल केले गेले आहेत. वास्तविक या कायद्यावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे होती, पण सरकारने ही चर्चा केली नाही. कामगार कायद्यात बदल करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध राहील, असं सोनिया गांधी म्हणाल्या. देशाचा जीडीपी निगेटिव्हमध्ये जाणार आहे. अर्थव्यवस्था कोसळली आहे, यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, असं वक्तव्य सोनिया गांधींनी बैठकीत केलं. अम्फान चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीला १७ पक्षांचे नेते उपस्थित
सोनिया गांधींनी बोलावलेल्या या बैठकीला १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, स्टालिन यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थिती लावली. सोनिया गांधींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून, संजय राऊत सामना कार्यालयातून आणि शरद पवार पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमधून बसले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”