औरंगाबाद – भाजपच्या अशोक दामले यांच्यावर झालेल्या आरोपामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले असतानाच या प्रकरणाला शुक्रवारी (दि. ३) अचानक वेगळे वळण लागले. पुंडलिकनगर ठाण्यासमोर आधी राजकीय राड्याचा प्रयोग झाला. त्यातून फारसे काही साध्य न झाल्याने आता विषाचा प्रयोग करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडितेने शुक्रवारी सकाळीच विषारी द्रव पिले. धक्कादायक म्हणजे, आरोपी दामले यांच्या पत्नीनेही दुपारी विषारी द्रव घेतले. दोघींवरही उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
यावषयी अधिक माहिती अशी कि, अशोक दामले आणि त्यांच्या पत्नीने २९ ऑगस्ट रोजी २९ वर्षीय पीडितेला रॉडने मारहाण केली होती. या प्रकरणात दामले दांपत्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, अशोक दामले यांनी हनुमाननगरात सह्यांची मोहीम राबवून पीडितेविषयी अपशब्द लिहून निवेदन व काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यावरून पीडितेने दामलेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. या प्रकरणात ३१ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी पुंडलकनगर ठाण्यासमोर मोठा राडा केला होता. त्यानंतर अखेर दामलेविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला विनयभंगाचा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेला एफआयआरची प्रत दिली. मात्र, दुसऱ्या दिवशी यात विनयभंगाच्या कलम ३५४ ऐवजी शब्दोच्चाराने बदनामी केल्याचे कलम ५०९, ५०२ केल्याचे समोर आले. कलमांची ही अदलाबदल दुसऱ्या दिवशी पीडितेला सांगण्यात आली.
दामले आणखी बदनामी करेल या भितीने घेतले विष – पीडितेची मुलगी
दामलेविरुद्ध दोन गुन्ह्यात फिर्यादी असलेल्या पीडितेला दामले यापुढेही आणखी बदनामी करेल, अशी भिती वाटली. त्यात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता दोन महिला दामलेंच्या घरी आल्या होत्या. त्यांच्यात जोरजोरात चर्चा सुरु होती. ते पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याबाबत बोलत असल्याचे पीडितेने ऐकले होते. त्यामुळे तिला रात्रभर झोपही लागली नाही. तिच्या मुलीही जाग्याच राहिल्या. पहाटे चार वाजता त्यांना डोळा लागताच सहाच्या सुमारास पीडितेने फिनेल पिले. तिला उलट्यांचा त्रास व्हायला लागल्यावर हा प्रकार समोर आला. त्यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले, अशी माहिती पीडितेच्या मुलींनी दिली. हा प्रकार पुंडलिकनगर पोलिसांना समजल्यानंतर उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी घाटीत जाऊन पीडितेचा जबाब नोंदविला.
पतीवर कारवाई होऊ नये म्हणून सरला दामलेंनी घेतले विष –
पीडिता विष पिल्याचा प्रकार समजल्यानंतर आरोपी अशोक दामले यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता पती अशोक दामले यांच्यावर पोलिस कारवाई होऊ शकते, पोलिस त्यांना अटकही करु शकतात, अशी भिती पत्नी सरला दामले यांना वाटली. त्यामुळे त्यांनीही विषारी द्रव प्राशन केले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुंडलिकनगर पोलिस त्यांचा जबाब घेण्यासाठी गेले असता त्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलिस जबाब घेऊ शकले नाहीत. संध्याकाळी पुन्हा एकदा पोलिस पाठवून बघू, असे पोलिस निरीक्षक गांगुर्डे यांनी सांगितले.