परभणी : हॅलो महाराष्ट्र – ( गजानन घुंबरे) – आषाढी एकादशी दिवशी उपवासासाठी आणलेली भगर व शाबूदाणा यांचे मिश्रण असलेल्या पिठाची भाकर खाल्ल्यानंतर परभणी जिल्हातील पाथरी येथील एकाच कुटुंबातील 17 व्यक्तींना विषबाधा झाल्याची घटना 20 जुलै घडली असून अशाचप्रकारे याच तालुक्यातील कानसुर येथे 4 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे .दरम्यान सर्व रुग्णांवर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पाथरी शहरातील नामदेव नगर येथील एकाच कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक यांनी बाजारातून साबुदाणा व भगर यांचे तयार पिठ खरेदी केले होते .त्यापासून भाकरी करून त्या आषाढी एकादशीनिमित्त खाण्यात आल्या.
यानंतर या कुटुंबातील काही सदस्य मजुरी कामानिमित्त मानवत तालुक्यातील सावळी सावरगाव येथे एका शेतात गेल्यानंतर त्यांना चक्कर येत उलटी व जुलाबाचा त्रास सुरु झाला होता . अशी माहिती या कुटुंबातील व्यक्तीने हॅलो महाराष्ट्र शी बोलत असताना दिली आहे. दरम्यान यावेळी घरी थांबलेल्या व्यक्तींनाही चक्कर उलटी अशा तक्रारी सुरू झाल्या . मंगळवारी सायंकाळी उशिरा हे सर्व रुग्ण खाजगी दवाखाना व त्यानंतर पाथरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते.
सर्व रुग्णांवर उपचार चालू असून उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुमंत वाघ यांनी सांगितले. दरम्यान पाथरी तालुक्यातील कानसुर येथे एकाच कुटुंबातील दोन पुरुष व दोन महिला यांना उपवासाची भगर खाल्ल्यानंतर संध्याकाळी उशिरा चक्कर येणे उलटी होणे असा त्रास सुरू झाला होता . १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते.