बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या टोळीचा पर्दाफाश; एकाच महिलेचे अनेकांशी विवाह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या टोळीचा देवगाव रंगारी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य सूत्रधार महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. एकाच महिलेचे विवाह लावून अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

याबाबत माहिती अशी की, पैसे घेऊन लग्न लावणा-या व फसवणूक करणा-या सक्रीय टोळीची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना खब-याकडून मिळाली. त्यानुसार अहिरे यांनी बनावट नवरदेव तयार करून या वरामार्फत टोळीशी संपर्क साधला. त्यांना लग्नासाठी मुलगी हवी आहे, अशी बतावणी करून देवगाव फाटा येथील हॉटेल पदमावतीजवळ लग्नाच्या बोलणीकरिता बोलावले. त्यानुसार या टोळीला पकडण्यासाठी हॉटेल पदमावतीच्या बाहेर साध्या वेशात पोलिसांनी सापळा रचला. दुपारी 2:45 च्या सुमारास हॉटेल पदमावती समोर (एम.एच. 15 इ.इ. 0256) वाहनातून तीन महिला व एक पुरूष हॉटेल पदमावतीसमोर उतरून उभे राहिले. तेथे साध्या वेशातील खब-याने पोलिसांना टोळीबाबत इशारा देताच, पोलिसांनी या सर्व व्यक्तींना पकडून टोळीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी टोळीची मुख्य सूत्रधार आशा विलास खडसे (रा. रेल्वे स्टेशन, वाशीम), तिच्यासोबत लग्नाकरिता आलेली मुलगी कल्पना सुधाकर पाटील (रा. कासगाव, मुंबई) व तिची सहकारी सविता चंद्रकला कुलकर्णी (रा. नाशिक), निलेश दिलीप पाटील (रा. नाशिक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य आरोपी आशा खडसे हिचे सखोल चौकशी केली असता. तिच्या मोबाईलमध्ये एकाच महिलेचे अनेकांशी विवाह केल्याचे फोटो मिळून आले आहे.

ही टोळी प्रामुख्याने एजंटमार्फत लग्नास इच्छुक मुलांची माहिती घेऊन त्यांना घेरतात व त्यांच्याशी बोलणी करून मुलीचे आई – वडील, मावशी असे बनून लवकरात लवकर लग्न करायचे सांगतात. अशाच प्रकारे या टोळीने पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील माळीवडगाव येथील एका व्यक्तीकडून दोन लाख पन्नास हजार रूपये घेऊन त्यांचे लग्न लावून दिले होते. लग्नानंतर साधारण पाच दिवसांनी यातील वधू हिने लग्नात मिळालेले 40,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.

या टोळीतील आरोपींकडून मोबाईल व महिलेच्या बनावट आधारकार्डसह एक इंडिका कार असे 4,55,0000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अशाच प्रकारे नाशिक, जळगाव, औरंगाबाद यासह गुजरात राज्यात बनावट लग्न लावुन पैसे उकळून फसवूक केल्याचे निष्पन्न होत आहे.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आवाहन केले आहे की, लग्न संबध जोडताना वधू-वर पक्षांनी एकमेकांची सखोल चौकशी करावी, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये वर पक्षाकडील मंडळी बदनामीच्या धाकाने तक्रार करण्यास समोर येत नाही. त्यांनी निसंकोचपणे पुढे येऊन तक्रार दाखल करावी.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, पोलीस अंमलदार अप्पासाहेब काटे, मनोज लिंगायत, लता भोसले, ठोंबरे, गवळी, जाधव, गिरी यांनी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment