सोनगीर पोलिसांची मोठी कारवाई ! वाहनातून तब्बल 90 तलवारी घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये पोलिसांनी तलवारी जप्त करत मोठी कारवाई करून चार जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच 09 सीएम 0015 या कारला सोनगीर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली.

यामुळे पोलिसांना या कारवार संशय आला. व त्यांनी पाठलाग करून सदर गाडी थांबवून चौकशी केली तसेच गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता पोलिसांना गाडीत तब्बल 90 तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी तत्काळ चारही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच तलवारीही जप्त केल्या आहेत.

हे आरोपी चित्तोडगड येथून 90 तलवारी जालना येथे घेऊन जात होते. या कारवाईत सोनगीर पोलिसांनी 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोनगीर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही कारवाई सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व विभागीय पोलीस उपअधीक्षक प्रदीप माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

Leave a Comment